शाळा बंद करून शिक्षक पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:49 PM2018-08-02T23:49:54+5:302018-08-02T23:50:29+5:30
तालुक्यातील टेकडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गुरूवारी दुपारीच शाळेला सुटी देऊन पसार झाले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी अचानक भेट दिली असता, सदर शिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील टेकडा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गुरूवारी दुपारीच शाळेला सुटी देऊन पसार झाले. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती जयसुधा जनगाम यांनी अचानक भेट दिली असता, सदर शिक्षकांचे पितळ उघडे पडले आहे.
टेकडाताला येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नियमित येत नाही. आले तरी कधीही शाळा बंद करून निघून जातात, अशी तक्रार पालकांनी जिल्हा परिषद सभापती जयसुधा जनगाम यांच्याकडे केली होती. याची शहानिशा करण्यासाठी जनगाम यांनी गुरूवारी दुपारी टेकडा येथील केंद्र शाळेला भेट दिली असता, शाळा कुलूपबंद असल्याचे आढळून आले. विद्यार्थी मात्र शाळेच्या आवारातच खेळत होती. विद्यार्थ्यांना शिक्षक कुठे गेले, असे विचारले असता, शाळेला सुटी देऊन घरी गेले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. यावरून पालकांनी केलेल्या तक्रारीत तत्थ्य आढळले. संबंधित शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे पालक त्रस्त झाले आहेत. विद्यार्थ्यांचेही नुकसान झाले आहे. शाळेत नियमित न येणे, वाटेल तेव्हा सुटी देणे हे नेहमीचेच प्रकार झाले आहेत. संबंधित शिक्षकांना केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी जि.प.सभापती जयसुधा जनगाम यांनी केली आहे.