शिक्षकांची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 01:02 AM2018-07-26T01:02:52+5:302018-07-26T01:03:28+5:30

राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत.

Teachers | शिक्षकांची वाणवा

शिक्षकांची वाणवा

googlenewsNext
ठळक मुद्दे४० शाळांमधील चित्र : भामरागड, एटापल्ली, सिरोंचात पदे रिक्त

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फत यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या. मात्र या बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्याच्या अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. विशेष करून भामरागड, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यात जवळपास ४० शाळांमध्ये सद्य:स्थितीत एकच शिक्षक कार्यरत असल्याची माहिती आहे. दुर्गम भागातील शिक्षणाचा हा खेळखंडोबा बंद करण्याची मागणी होत आहे.
एटापल्ली पंचायत समिती अंतर्गत सोहगाव, मेंढरी, गुडराम, गुंडाम, पुन्नूर, कोठी, देवदा, मवेली, पुसुमपल्ली, येडसगोंदी, नेंडेर या जि.प. शाळांमध्ये शिक्षकांची एक ते दोन पदे रिक्त आहे. मोहंदी, वाळवी, बेसेवाडा, आलेंगा, सूरजागड, पुरसलगोंदी, गोडेली, मेंढरी, तोडगट्टा, पिपली बुर्गी, कचलेर, कुकेली, कोरनार, मोहुर्ली, कुदरी, हेटळकसा, वेलमागड, कुंडूम, जवेली, उईकेटोला, वांगेतुरी, रेगाटोला, जारावंडी, गट्टा, गिलगुड्डा, झारेवाडा, गोरगट्टा, येरवळवी, मोहंदी, वाळवी, बेसेवाडा, कोईनवशी, मुरेवाडा, नैताला, हाचबोडी, रेकलमेटा, मदाकुई, पुस्कोटी, रेकाभटाळ, नैनवाडी, जाजावडी, गट्टागुड्डा आदी शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांचे पद रिक्त आहे.
एटापल्ली तालुक्यातील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा आहेत. चार वर्ग असलेल्या शाळांमध्येच शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. उच्च प्राथमिक शाळांचीही परिस्थिती शिक्षकांच्या बाबतीत अशीच आहे.
आॅनलाईन बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांची जवळपास ४०, प्राथमिक शिक्षकांच्या २०० वर जागा रिक्त आहेत. उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचीही १५ वर पदे रिक्त आहेत. अहेरी उपविभागातील अनेक शाळा दुर्गम, अतिदुर्गम व अवघड क्षेत्रात आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या आॅनलाईन बदली प्रक्रियेदरम्यान शहरी भागातील शिक्षकांनी अवघड क्षेत्रातील शाळांबाबतचा प्रस्ताव अर्जात नमूद केला नाही. त्यामुळे ही स्थिती आहे.
अनेक शिक्षक वैद्यकीय रजेवर, काही शिक्षक रूजू होईना
जि.प. शिक्षकांच्या आॅनलाईन बदली प्रक्रियेनंतर जिल्ह्यातील जवळपास ४०० शिक्षक विस्तापित झाले. सदर बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याचे कारण देत ५७ शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अवघड क्षेत्रात बदली झालेले शिक्षक संबंधित शाळेत रूजू झाले. मात्र त्यानंतर जवळपास ५० शिक्षक वैद्यकीय रजेवर गेले असल्याची माहिती आहे. बदली होऊनही दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये रूजू झाले नाही. त्यामुळे अहेरी उपविभागातील सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, मुलचेरा या पाच तालुक्यात शिक्षकांचा दुष्काळ निर्माण झाला आहे. अहेरी उपविभागातील दुर्गम शाळांमध्ये गटशिक्षणाधिकाऱ्यांनी इतर शाळांमधील शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात बदली करून यावर तोडगा काढला आहे.

शासनाकडून शिक्षक भरती प्रक्रिया बंद आहे. आॅनलाईन बदली प्रक्रियेत अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये शिक्षक गेले नाही. भामरागड तालुक्यातील १४२ शिक्षकांची शहरी भागात बदली झाली. तर या तालुक्यात नव्याने ७० शिक्षकांची बदली करण्यात आली. त्यामुळे या तालुक्यात शिक्षकांच्या निम्म्या जागा रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ज्या ठिकाणी तीन ते चार व दोन शिक्षक आहेत, अशा ठिकाणच्या शाळांमधील शिक्षकांची दुर्गम शाळांमध्ये तात्परत्या स्वरूपात बदली करण्याचे आदेश बीओंना यापूर्वीच देण्यात आले होते.
- पी.एच.उरकुडे, प्रभारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प.गडचिरोली

Web Title: Teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.