शिक्षकांना आता दूरदर्शन प्रक्षेपणाद्वारे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:09 PM2018-09-17T12:09:07+5:302018-09-17T12:10:36+5:30
यावर्षी पहिली व आठवीचा अभ्यासक्रम पुनर्रचित करण्यात आला. नव्या पाठ्यपुस्तकांची ओळख करून देण्यासाठी आता विद्या प्राधिकरणने दूरदर्शनच्या डीटीएच वाहिनीद्वारे प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली आहे.
विनोद ताजने /दिगांबर जवादे
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ/गडचिरोली : गतवर्षी विद्या प्राधिकरणाने मोबाईलवर अॅपचा वापर करून शिक्षकांना इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले. हा प्रयोग यशस्वी झाल्याने आता शिक्षकांना वर्गात बसवून प्रशिक्षण देण्याची योजनाच संपुष्टात आली आहे. यावर्षी पहिली व आठवीचा अभ्यासक्रम पुनर्रचित करण्यात आला. नव्या पाठ्यपुस्तकांची ओळख करून देण्यासाठी आता विद्या प्राधिकरणने दूरदर्शनच्या डीटीएच वाहिनीद्वारे प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली आहे. २४ ते २८ सप्टेंबर दरम्यान शिक्षकांना हे प्रशिक्षण त्यांच्या शाळांमध्ये दिले जाणार आहे.
राज्य मंडळाशी संलग्न राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्यातील ६३ हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. या सर्व शाळा प्रशिक्षणाचे केंद्र राहणार आहे. आवश्यकता पडल्यास दोन-तीन शाळांमिळून किंवा केंद्र शाळेत शिक्षकांना एकत्र करून प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षण जीओ टीव्हीच्या मोबाईल अॅपमधूनही घेता येणार आहे. प्रशिक्षणार्थींची लिंकच्या माध्यमातून उपस्थितीही नोंदविली जाणार आहे.
प्रशिक्षणाच्या अखेरीस सर्व शिक्षकांनी गुगलफार्मवर आपले अभिप्राय नोंदवायचे आहे. प्रत्येक विषयाचा प्रशिक्षण कालावधी एक तासाचा ठेवण्यात आला आहे. एका तासात एका विषयाच्या पाठ्यपुस्तकाचा परिचय करून दिला जाणार आहे. विद्या प्राधिकरणने प्रशिक्षणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्रत्येक विषयशिक्षकाला प्रशिक्षणाची जबाबदारी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्यावर सोपविली आहे.