जिल्ह्यातील शिक्षकांनी वाबळेवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षकांसाेबत साधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:42 AM2021-03-01T04:42:31+5:302021-03-01T04:42:31+5:30
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील बाबळेवाडी या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. ३२ विद्यार्थी, २ शिक्षक आणि ४ खोल्या ...
पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील बाबळेवाडी या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. ३२ विद्यार्थी, २ शिक्षक आणि ४ खोल्या ते सव्वादोनशे विद्यार्थी, सात वर्ग आणि दोनच शिक्षक तरी मूल्यांकनात पूर्ण जिल्ह्यातून प्रथम अशी वाबळेवाडीची शाळा आहे. आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून दर्जा मिळण्यापर्यंतची शैक्षणिक क्रांती कशी झाली, यावर वाबळेवाडी शाळेतील शिक्षक दत्तात्रय वारे यांच्याकडून प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शिक्षकांनी माहीती जाणून घेतली.
संवादसत्रात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डॉ. विनित मत्ते , ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.जगन्नाथ कापसे यांच्यासह सर्व अधिव्याख्याता, विषय सहाय्यक तसेच सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षक उपस्थित होते. अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षक मिळून २७९ जण सहभागी झाले होते. अनेक प्रश्न विचारून आपल्या मनातील शंकांचे निरसन केले. वारे गुरुजींनी सर्वांशी संवाद साधून आपण शाळेत राबविलेल्या कार्यक्रम व उपक्रमाची माहिती दिली. विषयमित्र हा उपक्रम कसा राबवायचा, याची विस्तृत माहिती त्यांनी दिली.
वारे गुरुजींनी केलेले मार्गदर्शन जिल्ह्यातील शिक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन डायट संस्था गडचिरोलीचे प्राचार्य डाॅ.विनित मत्ते यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
ऑनलाईन संवादसत्राचे आयोजन डायटच्या विषय सहाय्यक सुचरिता काळे यांनी केले.
संवादसत्रासाठी साधनव्यक्तींनी तसेच तंत्र सहाय्यक तपन सरकार विठ्ठल होंडे यांनी तांत्रिक सहकार्य केले.