लसीकरणाकडे शिक्षकांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:26 AM2021-07-18T04:26:25+5:302021-07-18T04:26:25+5:30
जिल्हाभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा गुरुवारपासून सुरू झाल्या. शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये काेराेना पसरू नये यासाठी शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक ...
जिल्हाभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा गुरुवारपासून सुरू झाल्या. शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांमध्ये काेराेना पसरू नये यासाठी शिक्षण विभागाने सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना शाळा सुरू होण्याच्या काही दिवसांपूर्वी काेराेनाची लस घेणे आवश्यक केले होते. ज्या शिक्षकांनी काेराेनाच्या दोन्ही लस घेतल्या आहेत. त्यांना चाचणीतून वगळण्यात आले होते, मात्र ज्यांनी एकच डाेस घेतला किंवा एकही डाेस घेतला नाही, अशांना मात्र काेराेना चाचणी करणे आवश्यक करण्यात आले होते.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५९ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. जवळपास तीन हजार शिक्षक या शाळांमध्ये कार्यरत आहेत. शाळेत जाण्यापूर्वी कोरोना चाचणी करणे शिक्षण विभागाने आवश्यक केले असले तरी अनेक शिक्षकांनी हा नियम धाब्यावर बसविला असल्याचे दिसून येत आहे. केवळ एक ते दोन टक्केच शिक्षकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी चाचणी केली. अनेक शिक्षक शहरात वास्तव्यास राहतात. शहरातून ग्रामीण भागात असलेल्या शाळेत दर दिवशी ते ये-जा करतात. काेराेनाचा प्रसार प्रामुख्याने शहरी भागात अधिक असल्याने या शिक्षकांपासून विद्यार्थ्यांना काेराेनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या शिक्षकांनी कोरोना लसचा एक डोस घेतला आहे किंवा ज्यांनी अजिबात लस घेतली नाही त्या शिक्षकांना काेराेना चाचणी सक्तीची करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
सोमवारपासून वाढणार उपस्थिती
शासनाच्या आदेशानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दि. १५ जुलैपासून सुरू करण्यात आल्या असल्या तरी काही ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण २५९ शाळांपैकी गुरुवारी केवळ १९६ शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी जवळपास २५ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आढळून आली सोमवारपासून विद्यार्थी उपस्थिती पुन्हा वाढण्याची शक्यता शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद दिसून येत आहे.
पूर्वीप्रमाणे शिबिर नाही
मागील वर्षीच्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांना काेराेना चाचणी करणे आवश्यक केले होते. त्यासाठी आरोग्य विभागाने स्वतंत्र शिबिर आयोजित केले होते. यावर्षी मात्र आरोग्य विभागाने शिबिरांचे आयोजन केले नाही. त्यामुळे बहुतांश शिक्षकांनी काेराेना चाचणी केली नाही.
पहिल्या दिवशी उपस्थिती
आठवी
एकूण विद्यार्थी-१६,११७
उपस्थिती- ३,२९५
नववी
एकूण विद्यार्थी- १६,९८९
उपस्थिती -३,५६१
दहावी-
एकूण विद्यार्थी- १६,८५७
उपस्थिती-३,४५७
बारावी-
एकूण विद्यार्थी-१३,१४८
उपस्थिती- ३,१२६
’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’
एकूण शाळा- २५९
एकूण शिक्षक-३,०००