शिक्षकाच्या बदलीस विरोध
By admin | Published: August 8, 2015 01:41 AM2015-08-08T01:41:34+5:302015-08-08T01:41:34+5:30
तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाची बदली केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, ...
शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : कोरेगाववासीयांचा आंदोलनाचा इशारा
आरमोरी : तालुक्यातील कोरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाची बदली केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
कोरेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने यावर्षी नाविण्यपूर्ण उपक्रम सुरू करून वर्ग पाच ते आठवीपर्यंत सेमी इंग्रजीचे शिक्षण सुरू केले. या वर्गांमध्ये एकूण ८१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आरटीई कायद्यानुसार कोरेगाव येथे चालू सत्रापासून आठवा वर्ग सुरू करण्यात आला. अतिशय मागास गावात सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करणारी तालुक्यातील एकमेव शाळा आहे. या शाळेत कोरेगावसह जवळपासच्या गावातीलही विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत आहेत.
या शाळेत एकूण सहा शिक्षक कार्यरत आहेत. मात्र एका शिक्षकाला शिक्षण विभागाने अतिरिक्त ठरवत त्याची दुसऱ्या शाळेत बदली करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या शिक्षकाची बदली झाल्यास केवळ पाच शिक्षक कार्यरत राहतील. त्यामुळे सेमी इंग्रजीचे अध्यापन करणे कठीण जाणार आहे. याबाबत गावस्तरावर चर्चा करून शाळा व्यवस्थापन समितीच्या व ग्राम पंचायतच्या आमसभेत ठराव घेऊन कार्यरत असलेल्या सहाही शिक्षकांच्या भरवशावर सेमी इंग्लिश माध्यम सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकाची बदली करू नये, असे म्हटले आहे.
याबाबत गावकऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. बदली झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कोरेगावच्या सरपंच जे. जे. उसेंडी, माजी सरपंच बालाजी गेडाम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र किरंगे, अशोक कुमरे, उपाध्यक्ष दीपाली ताडाम, जयदेव उसेंडी, वासुदेव कुमोटी, राजेश्वर तुलावी, श्रीराम उसेंडी, अनिता मडावी, आशा दर्राे, लीलाबाई कोसरे, वनिता दर्राे, सुषमा अंबादे, मंगरू टेंभुर्णे आदींनी दिला आहे. (प्रतिनिधी)