शिक्षकांची पाल्यांच्या घरी वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:14 AM2019-03-29T00:14:50+5:302019-03-29T00:15:16+5:30
तत्कालीन शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे ‘गाव तिथे शाळा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. परिणामी गल्लीबोळात इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. आता गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी शिक्षकांना आपली नोकरी टिकविण्यासाठी पालक व पाल्यांच्या घरी भटकंती करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तत्कालीन शासनाच्या उदारमतवादी धोरणामुळे ‘गाव तिथे शाळा’ हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आला. परिणामी गल्लीबोळात इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटले. आता गेल्या चार ते पाच वर्षांपासून दरवर्षी शिक्षकांना आपली नोकरी टिकविण्यासाठी पालक व पाल्यांच्या घरी भटकंती करावी लागत आहे.
आमची शाळा चांगली आहे, विविध सोयीसुविधा असून चांगला निकाल देण्याची तसेच गुणवत्तेची हमी असल्याचे सांगून आमच्याच शाळेत मुलांचा प्रवेश करा, प्रवेश फी मी भरतो, तुम्ही दाखल द्या, अशी मनधरणी ग्रामीण भागातील बहुतांश शिक्षक पालकांपुढे करीत आहेत.
सन २०१९-२० हे शैक्षणिक सत्र २६ जून २०१९ रोजी सुरू होणार आहे. या शैक्षणिक सत्रासाठी आतापासूनच विद्यार्थ्याचे प्रवेश पूर्ण केले जात आहेत. गेल्या सात-आठ वर्षात तालुका मुख्यालयासह जिल्हा तसेच मोठ्या गावांमध्ये इंग्रजी व मराठी माध्यमांच्या शाळांची संख्या झपाट्याने वाढली. परिणामी विद्यार्थी पटसंख्या मिळविण्यासह टिकविण्यासाठी संबंधित संस्था व शाळांमधील शिक्षकांची मोठी कसरत होत आहे.
सध्या शालेय परीक्षांचा काळ सुरू आहे. सकाळच्या सत्रात शाळा सुरू असून परीक्षा घेतल्या जात आहेत. अशास्थितीत अनेक शाळांचे शिक्षक दुपारी ४ वाजतानंतर सायंकाळी ७ वाजेपर्यंत शाळा परिसरातील अनेक गावांमध्ये फिरून इयत्ता पहिली, पाचवी, आठवीतील प्रवेशित मुलांचे दाखले मिळवित आहेत. काही शाळांमधील अर्धे शिक्षक सकाळपाळीत तर काही शिक्षक दुपारपाळीत गावागात फिरून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्याच्या कामात व्यस्त आहेत. यामध्ये नर्सरीपासून ते माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षकांचा समावेश आहे. ग्रामीण भागात शिक्षकांच्या भेटी वाढल्या आहेत.
निवडणुकीच्या ड्युटीमुळे यंदा लवकरच मोहीम
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी ११ एप्रिल रोजी मतदानाची प्रक्रिया घेण्यात येणार असून या निवडणुकीच्या कामासाठी अनेक शाळांच्या शिक्षकांची ड्यूटी लावण्यात आली आहे. तसे पत्रही संबंधित शिक्षकांना प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बहुतांश शिक्षक ७ ते ११ एप्रिल या कालावधीत निवडणुकीच्या कामात व्यस्त राहणार आहेत. निवडणुकीच्या या कामामुळे प्रवेशित विद्यार्थ्यांचे दाखले मिळविण्यासाठीचा हा हंगाम यंदा १५ दिवसांपूर्वी सुरू झाला आहे. शाळांसाठीची प्रवेशित विद्यार्थी संख्या निश्चित केल्यानंतर शिक्षक निवडणुकीच्या कामाकडे वळणार आहेत. पाल्यांच्या दाखल्यासाठी पालकांना विविध प्रकारचे आमिषही अनेक शिक्षक देत असल्याची माहिती आहे. एकूणच शिक्षकांची कसरत सुरू आहे.