शिक्षकांनी तंत्रस्नेही होणे गरजेचे
By admin | Published: April 14, 2017 01:26 AM2017-04-14T01:26:11+5:302017-04-14T01:26:11+5:30
प्राथमिक शिक्षणातूनच माणूस घडत असतो. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत होणे आवश्यक आहे.
अडपल्लीत डिजिटल शाळेचे उद्घाटन : विलास दशमुखे यांचे प्रतिपादन
गडचिरोली : प्राथमिक शिक्षणातूनच माणूस घडत असतो. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत होणे आवश्यक आहे. आता आॅनलाईनचा वापर वाढल्याने शिक्षकांनी तंत्रस्नेही बनून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधावा, असे प्रतिपादन पं. स. उपसभापती विलास दशमुखे यांनी केले.
तालुक्यातील अडपल्ली येथील जिल्हा परिषद शाळेत चार डिजिटल वर्गखोल्यांचे उद्घाटन गुरूवारी करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून जि. प. सदस्य वर्षा कौशिक, अध्यक्षस्थानी पं. स. सभापती दुर्लभा बांबोळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी पचारे, सुषमा मेश्राम, सरपंच भूमिका मेश्राम, शिक्षण विस्तार अधिकारी खोब्रागडे, पंचायत विस्तार अधिकारी रतन शेंडे, दिलीप कौशिक, उपसरपंच खुशाल पोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील भोयर, पोलीस पाटील सपना रायपुरे, जितेंद्र मुप्पीडवार, श्यामराव फुलझेले, राजेंद्र सालोटकर, उषा डोंगरे, खोब्रागडे आदी उपस्थित होते.
१४ व्या वित्त आयोगाच्या ९९ हजार २०० रूपयांच्या निधीतून चार एलईडी टीव्ही, चार साऊंड, प्रोजेक्टर व इतर साहित्य घेण्यात आले, अशी माहिती ग्रामसेवक ए. वाय. खेवले यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद खांडेकर यांनी केले. तर आभार कैलास कोरोटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक शिक्षिका गीता मानकर, शेख, गुणवंत म्हशाखेत्री, मिथून लोणारे, पत्रूजी बाबनवाडे यांनी सहकार्य केले. यावेळी नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)