शिक्षकांनी आपल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 11:58 PM2017-09-05T23:58:08+5:302017-09-05T23:59:00+5:30
समाजात वावरताना गुरूंनी आपले आचरण चांगले ठेवावे. गुरूंचे आचरण विद्यार्थी आत्मसात करतात. त्यामुळे त्यांनी चांगल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावा, असा सल्ला पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सोमवारी शिक्षकवृंदांना दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : समाजात वावरताना गुरूंनी आपले आचरण चांगले ठेवावे. गुरूंचे आचरण विद्यार्थी आत्मसात करतात. त्यामुळे त्यांनी चांगल्या आचरणातून विद्यार्थ्यांपुढे आदर्श ठेवावा, असा सल्ला पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी सोमवारी शिक्षकवृंदांना दिला.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षक दिनानिमित्त आयोजित आदर्श शिक्षक सत्कार सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर तर अतिथी म्हणून आ.डॉ.देवराव होळी, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी शांतनू गोयल, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती अजय कंकडलावार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर यांनी मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे का वळले याचा विचार शिक्षकांनी करून आपल्या भागातील विद्यार्थी आपल्याच शाळेत शिकला पाहीजे यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन शिक्षकांना केले. आ.डॉ.होळी, सीईओ गोयल यांनीही मार्गदर्शन केले.
यावेळी आदर्श शिक्षक म्हणून निवडलेल्या ९ शिक्षकांचा सपत्निक शाल-श्रीफळ तसेच साडी-चोळी, प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह तसेच प्रत्येकी ११०० रुपये देऊन सत्कार करण्यात आला. त्यात खुशाल नकटू चुधरी (जि.प. उच्च प्राथमिक शाळा दुर्गापूर), मोतीराम दादाजी वैरागडे (जि.प. उच्च प्राथमिक शाळा वेनासर), तुकाराम बाबुराव दडगेलवार (जि.प. उच्च प्राथमिक शाळा विहिरगाव), प्रकाश भिकाजी जुआरे (जि.प. उच्च प्राथमिक शाळा मेडपल्ली), दिवाकर लक्ष्मण मादेशी (जि.प. उच्च प्राथमिक शाळा आंबटपल्ली), मीना नानाजी दवंडे (जि.प. उच्च प्राथमिक शाळा कुंभीटोला), दिलीप रावजी नाकाडे (जि.प. उच्च प्राथमिक शाळा गांधीनगर), यादव लहानुजी शेंडे (जि.प. उच्च प्राथमिक शाळा बेडगाव), उत्तम ज्ञानबाजी म्हशाखेत्री (जि.प. उच्च प्राथमिक शाळा लेखा मेंढा) यांचा समावेश होता. याशिवाय प्रोत्साहनपर म्हणून साईनाथ सोमाजी सोनटक्के (जि.प. शाळा चामोर्शी) व योगराज तुळशिराम टेंभूर्णे (जि.प. शाळा हालेवारा) या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी (प्राथमिक) एम.एन.चलाख, संचालन केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार यांनी तर आभार उपमुख्य कार्यपालन अधिकारी (सामान्य) फरेंद्र कुतीरकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षण विभागातील बी.जे. अजमेरा, आर.व्ही. अक्केवार, एम.एस.दोनाडकर, जी.बी. धात्रक आदींनी सहकार्य केले.
कर्मचाºयांचाही सत्कार
यावेळी पहिल्यांदाच शिक्षण विभागातील उत्कृष्ट कर्मचाºयांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला. त्यात कनिष्ठ प्रशासन अधिकारी दिनकर बळीराम मारबते, सुरेश वासुदेव जुमनाके, वरिष्ठ सहायक बबन आबाजी भोयर, एस.डब्ल्यू. बेग, संगणक प्रोग्रामर प्रफुल्ल मेश्राम, परिचर किशोर एकनाथ दोडके व स्वच्छ विद्यालयाचा राष्टÑीय पुरस्कार पटकावणाºया धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शिंपी यांचा समावेश आहे.
अर्धवट शाळा व वीजेसाठी डीपीसीतून निधी देणार
जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडलावार यांनी आपल्या भाषणात काही जि.प.शाळांची डागडुजी, कंपाऊंड वॉलसाठी तसेच शाळांमध्ये वीज पुरवठा करण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून द्यावा अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली. त्यावर पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून त्यासाठी व्यवस्था करण्याची ग्वाही दिली.
आदर्श शिक्षक निवड प्रक्रिया सुलभ करा
यावेळी आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कृत विहीरगाव जि.प.शाळेचे शिक्षक तुकाराम दडगेलवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदर्श शिक्षक निवडीची प्रक्रिया किचकट असल्यामुळे दुर्गम भागातील शिक्षक यापासून वंचित राहतात. त्यामुळे शिक्षकांकडून प्रस्ताव न मागविता प्रशासकीय स्तरावरूनच आदर्श शिक्षकांची निवड केली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर पालकमंत्र्यांनी पुढे ही प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने प्रस्ताव सादर करून केली जाईल असे सांगितले.