शिक्षकांची भटकंती सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 10:48 PM2018-04-02T22:48:52+5:302018-04-02T22:48:52+5:30
मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या संपूर्ण जिल्हाभरात अलिकडील दोन-तीन वर्षात झपाट्याने वाढली. त्यामुळे सर्व शाळांना पुरेसे विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या संपूर्ण जिल्हाभरात अलिकडील दोन-तीन वर्षात झपाट्याने वाढली. त्यामुळे सर्व शाळांना पुरेसे विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाच्या उन्हाळ्यात एप्रिल महिन्यात शिक्षकांकडून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची शोधमोहीम सुरू झाली आहे. जिल्हा परिषद, खासगी व्यवस्थापन व आदिवासी विभागांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळेतील शिक्षक आता ग्रामीण भागात इयत्ता पहिली व पाचवीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी फिरत आहेत.
जिल्ह्याच्या १२ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दीड हजारवर मराठी माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली, भामरागड, अहेरी प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित मिळून १०० च्या आसपास आश्रमशाळा आहेत. याशिवाय खासगी व्यवस्थापनाच्या शाळांची संख्या मोठी आहे. गाव तिथे शाळा झाल्याने प्रवेशपात्र विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत दरवर्षी करावी लागते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा संबंधित वर्गाच्या प्रवेश क्षमतेइतक्या विद्यार्थ्यांचे प्रवेश करून घेण्यासाठी शिक्षकांची कसोटी लागणार आहे. जि.प. शाळांमधील शिक्षकांकडून इयत्ता पहिलीतील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण फेब्रुवारी महिन्यातच करण्यात आले. प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या आकड्यांसह अहवाल केंद्र प्रमुखांमार्फत गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे पोहोचला आहे.
खासगी शाळांमध्ये स्पर्धा लागणार
गडचिरोली, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, चामोर्शी, एटापल्ली, अहेरी, आलापल्ली, आष्टीसह जिल्ह्याच्या शहरी भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या प्रचंड वाढली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील मोठ्या गावांमध्ये इंग्रजी माध्यमांचे कॉन्व्हेंट गेल्या काही वर्षांपासून सुरू झाले आहे. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाकडे वाढला असल्याने या शाळांना विद्यार्थी मिळतात. मात्र खासगी व्यवस्थापनाच्या मराठी शाळांमध्ये फारसे प्रवेश होत नाही. त्यामुळे शहरातील खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित शाळांमधील शिक्षकांमध्ये प्रवेशपात्र विद्यार्थी मिळविण्यासाठी यंदाही स्पर्धा होणार आहे. काही शिक्षक यावर्षीही पालकांना आमिष देऊन प्रवेश निश्चित करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार नियोजन ठरले आहे.