किमया तंत्रज्ञानाची; गडचिरोलीच्या देसाईगंजमध्ये ‘टेस्ट ट्यूब’द्वारे गाईंच्या वासरांचा जन्म !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2022 08:00 AM2022-07-10T08:00:00+5:302022-07-10T08:00:02+5:30
Gadchiroli News उच्च वंशावळीतील गाईचे स्त्री-बीज आणि उच्च वंशावळीच्या वळूचे शुक्राणू वापरून प्रयोगशाळेत भ्रूण विकसित करून ते दुसऱ्या गाईत प्रत्यारोपण करण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा (देसाईगंज) येथील वळू माता प्रक्षेत्रात करण्यात आला.
विष्णू दुनेदार
गडचिरोली : उच्च वंशावळीतील गाईचे स्त्री-बीज आणि उच्च वंशावळीच्या वळूचे शुक्राणू वापरून प्रयोगशाळेत भ्रूण विकसित करून ते दुसऱ्या गाईत प्रत्यारोपण करण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग गडचिरोली जिल्ह्याच्या वडसा (देसाईगंज) येथील वळू माता प्रक्षेत्रात करण्यात आला. यात तीन फ्रिजवाल जातीच्या गाईंमध्ये हे भ्रूण प्रत्यारोपण केले होते. आयव्हीएफ (कृत्रिम परिवेशीय निषेचन) आणि इटीटी (भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान) याद्वारे यशस्वीरीत्या तिन्ही गाईंच्या वासरांचा (टेस्ट ट्यूब बेबी) जन्म झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रयोग आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पाळले जात असलेले पशुधन हे दूध उत्पादनाच्या दृष्टीने कमी प्रतीचे आहे. गाईंची दूध देण्याची क्षमता वाढावी, दुग्धोपादनात वाढ व्हावी आणि गोपालकांना अधिक आर्थिक लाभ मिळावा, या दृष्टीने नव्याने विकसित झालेले भ्रूण प्रत्यारोपण हे जैवतंत्रज्ञान सर्वाधिक प्रभावी ठरत आहे. या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर व्हावा म्हणून राष्ट्रीय गोकुळ मिशन, भारत सरकार यांच्या आर्थिक सहकार्याने, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे इटीटी आणि आयव्हीएफ प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून दुग्ध उत्पादनाची उच्च आनुवंशिकता असणाऱ्या साहिवाल, गिर, गवळावू, डांगी आणि देवनी या महाराष्ट्रातील स्थानिक प्रजातींच्या गाईंचे पुनरुत्पादन केले जात आहे.
या यशस्वी प्रयोगासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ.ए.एम. पातुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक व प्रकल्पप्रमुख डॉ.एस.के. सहातपुरे, सहायक प्रा.डॉ. मनोज पाटील, प्रा.डॉ. डी. एस. रघुवंशी, प्रा.डॉ. मीनाक्षी बावस्कर यांनी परिश्रम घेतले. तसेच प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. सतीश राजू, वळू माता संगोपन केंद्राचे डॉ. प्रशांत बुरले, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रतीक इंगळे पाटील यांनी सहकार्य केले.
- तर जिल्ह्यात होऊ शकते दुग्धक्रांती
गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराच्या संधी फार कमी आहेत. वडसा (देसाईगंज) येथील वळू माता प्रक्षेत्रात देशी जनावरांची उत्पादकता वाढविण्याकरिता आयव्हीएफ व इटीटी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतल्यास उच्च दुग्धक्षमता असलेल्या कालवडी तयार करण्यास मदत होऊ शकते. या कालवडी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिल्यास दुग्ध उत्पादन वाढून जिल्ह्यात दुग्धक्रांती होण्यास वेळ लागणार नाही.