मृतदेहासह नातेवाईक तहसील कार्यालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:55 PM2017-09-01T23:55:35+5:302017-09-01T23:55:51+5:30
डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यूू झाला असल्याचा आरोप करून दोषी डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतदेहासह नातेवाईकांनी गुरूवारी तहसील कार्यालय गाठले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : डॉक्टरच्या चुकीच्या उपचारामुळे रुग्णाचा मृत्यूू झाला असल्याचा आरोप करून दोषी डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मृतदेहासह नातेवाईकांनी गुरूवारी तहसील कार्यालय गाठले. तहसील कार्यालयात काही वेळ ठिय्या मांडल्याने चांगलाच गोंधळ उडाला. मात्र तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मृतदेह उचलण्यात आला.
कोरची येथूून १२ किमी अंतरावर असलेल्या नांदळी येथील धनकुमार अंकालूू उंदीरवाडे (४१) या इसमाला गुरूवारी रात्री २ वाजताच्या सुमारास विषारी साप चावला. त्याला गुरूवारी सकाळीच ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. डॉ. कावडकर यांनी रुग्णाची तपासणी केली. तेव्हा साप चावल्याचे लक्षण दिसले नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर सामान्य रुग्णाप्रमाणे औषधोपचार केला. दुपारी १२ वाजता रुग्णाची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. कोरची रुग्णालयातील १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका नादुरूस्त असल्याने खासगी दवाखान्याचे वाहन बोलविण्यात आले. मात्र ग्रामीण रुग्णालयातील दोन्ही वाहनचालकांनी सदर वाहन चालविण्यास नकार दिला. शेवटी शासकीय वाहनातूनच रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यासाठी नेले जात होते. मात्र वाटेतच धनकुमार उंदीरवाडे यांचा मृत्यू झाला. वाहन उपलब्ध होण्यासाठी पाच तासांचा उशीर झाला. वेळेवर उपचार न झाल्याने धनकुमार यांचा मृत्यू झाला असून यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी मृतदेह तहसील कार्यालयात नेण्यात आला. तहसीलदार पुष्पलता कुमरे यांनी शासनाकडून मिळणाºया सर्व योजनांचा लाभ कुटुंबाला दिला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह घरी नेण्यात आला.
याबाबत डॉक्टर सचिन कावडकर यांना विचारणा केली असता, विषारी सापाचे लक्षण दिसत नव्हते. त्यामुळे आपण सामान्य रुग्णाप्रमाणे उपचार केला. रूग्णाची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला असल्याचे लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.