आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या मुलांना तहसील कार्यालयाकडून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:25 AM2021-07-02T04:25:34+5:302021-07-02T04:25:34+5:30
येथील पप्पू सोनी यांचे कोरोनाकाळात निधन झाले. त्या अगोदर त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. आई-वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांची दोन मुले ...
येथील पप्पू सोनी यांचे कोरोनाकाळात निधन झाले. त्या अगोदर त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला. आई-वडिलांच्या आकस्मिक मृत्यूमुळे त्यांची दोन मुले आणि एक मुलगी पोरके झाले. त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्या भावंडांमधील मोठा भाऊ कसाबसा पार पाडत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर तहसीलदारांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनीही त्याला दुजोरा दिला.
सोनी कुटुंबातील त्या भावंडांना मदत म्हणून गहू, तांदुळ, आटा, किराणा आणि आर्थिक मदत त्यांच्या घरी जाऊन एसडीओ येरेकर यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी येरेकर यांनी मुलांचे शिक्षण आणि इतर अडचणींविषयी चौकशी केली. त्यांना रेशनकार्ड, जात प्रमाणपत्र, आई-वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र बनवून देण्यात येईल असे सांगत शासनाच्या योजनांचा लाभ देण्याची सूचना कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिली, तसेच कोणतीही अडचण आल्यास तहसील कार्यालयात येऊन भेटा, अशा शब्दात तहसीलदार सी. जी. पित्तुलवार यांनी त्यांना आधार दिला.
यावेळी नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेंबरे, नायब तहसीलदार दामोदर भगत, धनराज वाकुलकर, तलाठी अविनाश कोडापे, सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक कुरेशी, नगर पंचायत कर्मचारी अनिकेत कथळकर, गुलाब ठाकरे उपस्थित होते.