तहसीलवर मोर्चा धडकला

By Admin | Published: December 30, 2015 01:57 AM2015-12-30T01:57:21+5:302015-12-30T01:57:21+5:30

भामरागड तालुक्याच्या धोडराज येथील शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, ....

Tehsilvar Morcha shocked | तहसीलवर मोर्चा धडकला

तहसीलवर मोर्चा धडकला

googlenewsNext

निवेदन सादर : शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी द्या
भामरागड : भामरागड तालुक्याच्या धोडराज येथील शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या प्रमुख मागणीसह तालुका विकासाच्या विविध मागण्यांसाठी सर्व पक्षांच्या वतीने मंगळवारी काढण्यात आलेला विशाल मोर्चा हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भामरागड तहसील कार्यालयावर धडकला.
सदर मोर्चा येथील भामरागड नदीवरून तहसील कार्यालयाकडे काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसचे भामरागड तालुकाध्यक्ष मादी केसा आत्राम, मनसेचे अध्यक्ष दिनेश मडावी, पं. स. सभापती रंजना उईके, राकाँचे तालुकाध्यक्ष श्रीकांत मोडक, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिश्वास, भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे आदींनी केले.
या आंदोलनात भामरागडचे माजी सरपंच खुशाल मडावी, डॉ. भारती बोगामी, न. पं. उपाध्यक्ष शारदा कंबगौणीवर, माजी पं. स. उपसभापती लालसू आत्राम, नगर पंचायतीचे बांधकाम सभापती हरीभाऊ रालेपल्लीवार, काँग्रेसचे पदाधिकारी आसिफ सोफी, लक्ष्मीकांत बोगामी, राजू कुडसामी, वामन उईके, रमेश बोलमपल्लीवार, रामजी पुंगाटी, लालसू पुंगाटी, रमेश पुंगाटी, झोरू पुंगाटी, जाफर सुफी, भारती इष्टाम, जैबून निशा सुफी, अर्पणा सडमेक, विजय कुडयामी, इंदरशहा मडावी, अ‍ॅड. लालसू नरोटे, रामशहा मडावी, शत्रू मडावी, राजू पुडके, गिरीजा हलामी, जाकीर सय्यद हुसैन, दिनेश परसा, व्यंकटेश इष्टाम आदींसह नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, महिला बचतगट, शासकीय व अनुदानित आश्रमशाळा संघटनेचे पदाधिकारी, आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, आश्रमशाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रतिनिधी आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते. भामरागडच्या तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

या आहेत मागण्या
भामरागड तालुक्यातील धोडराज येथील अत्याचार प्रकरणातील आरोपींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा देण्यात यावी, प्रत्येक पोलीस ठाण्याला महिला समिती गठित करण्यात यावी, प्रत्येक शाळेच्या वसतिगृहाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक ठेवण्यात यावे, शालेय परिसरामध्ये शासकीय काम वगळता कोणतेही सार्वजनीक कार्यक्रम घेऊ नये, भामरागड तालुक्यात अवैधरीत्या दारूविक्रेत्यांवर बंदी घालण्यात यावी, प्रत्येक शाळांमध्ये पाण्याची व स्वच्छतागृहाची बांधणी करण्यात यावी, रिक्त असलेल्या शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, भामरागड येथील अभयारण्य आॅफीसच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, भामरागड तालुक्यातील सर्व विभागातील सर्व रिक्त पदे भरण्यात यावी, बारमाही वाहणाऱ्या नद्यांवर सिंचनाची सोय करण्यात यावी, आलापल्ली ते भामरागड - लाहेरीपर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करावी, ताडगाव ते मन्नेराजाराम रस्त्याची दुरूस्ती करावी, भामरागड तालुक्यातील डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यात यावी, आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांना वीज पंप, आॅईल इंजिन, सोलर पंपचे वाटप करण्यात यावे, खावटी कर्ज माफ करण्यात यावे, भामरागड तालुक्यात दुष्काळग्रस्त घोषित करुन शेतकऱ्यांच्या धानाला ३ हजार ५०० रुपय हमी भाव देण्यात यावे आदीसह निवेदनात विविध मागण्यांचा समावेश आहे.

Web Title: Tehsilvar Morcha shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.