कमलापुरात बससेवेसाठी तेलंगणाला साकडे
By admin | Published: November 6, 2016 01:33 AM2016-11-06T01:33:35+5:302016-11-06T01:33:35+5:30
कमलापूर परिसराचा संपर्क तेलंगणा राज्यात असल्याने येथील नागरिकांचे तेलंगणात नेहमीच आवागमन असते.
मुपालपल्लीत निवेदन : ग्रा.पं.चा पुढाकार
कमलापूर : कमलापूर परिसराचा संपर्क तेलंगणा राज्यात असल्याने येथील नागरिकांचे तेलंगणात नेहमीच आवागमन असते. येथे कमलापूर -तेलंगणा बससेवा सुरू झाल्यास नागरिकांसाठी सोयीचे होऊ शकते, ही बाब जाणून बससेवा सुरू करण्यासाठी येथील ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांच्या वतीने तेलंगणा राज्याच्या मुपालपल्ली येथे बस आगार प्रमुखांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
कमलापूर परिसरातील अनेक नागरिक तेलंगणा राज्यात ये-जा करीत असतात. या भागातील नागरिकांचे आप्तेष्ट तेलंगणा राज्यात वास्तव्यास असल्याने तसेच रोजगाराच्या शोधासाठी नागरिक ये-जा करीत असतात. तेलंगणा व कमलापूर परिसर बससेवेने जोडल्यास सोयीचे होऊ शकते, ही बाब जाणून येथील सरपंच रजनीता मडावी यांच्या नेतृत्वातील ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुपालपल्ली येथे बस आगाराला भेट देऊन टी. आर. गर्रे यांना निवेदन सादर करण्यात आले. मुपालपल्ली-सिरोंचा-अहेरी मार्गावर सुरू होणारी बस कमलापूर-छल्लेवाडा-राजाराम मार्गे सुरू करावी, अशी विनंती त्यांना करण्यात आली. शिष्टमंडळात मंगला दुर्गे, संतोष ताटीकोंडावार, महेश मडावी, शंकर रंगुवार, बकय्या चौधरी यांचा समावेश होता. (वार्ताहर)