गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना तेलंगणाचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:52 AM2018-12-14T11:52:05+5:302018-12-14T11:53:20+5:30
धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्यात यावर्षी १३ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली असताना जिल्हाभरात एकही कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस घेऊन राज्याची सीमा ओलांडून तेलंगणात जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : धान उत्पादक गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या काही वर्षांपासून कापसाचा पेरा वाढत आहे. यावर्षी १३ हजार ९७५ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झालेली असताना जिल्हाभरात एकही कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस घेऊन राज्याची सीमा ओलांडून तेलंगणात जावे लागत आहे.
आदिवासीबहुल आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात दोन लाख हेक्टरवर धानाचा पेरा होतो. परंतू अलिकडच्या काही वर्षात धानाचा पेरा कमी होऊन कापसाची लागवडही केली जात आहे. तेलंगणाच्या सीमेलगत असलेल्या गडचिरोलीच्या सिरोंचा, अहेरी, मुलचेरा, चामोर्शी या तालुक्यात तेलगू शेतकऱ्यांच्या मदतीने कापूस लागवडीचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. पण धानाप्रमाणे शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यासाठी एकही शासकीय कापूस खरेदी केंद्र नाही. त्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे. चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे असलेल्या जिनिंग फॅक्टरीकडूनही शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जाते. परंतू शासकीय दराएवढा दर कोणीही देत नाही. त्यामुळे काही मोठे शेतकरी तेलंगणा राज्यात जाऊन तेथील खरेदी केंद्रावर किंवा जिनिंगला आपला कापूस विकतात. खासगी व्यापाऱ्यांपेक्षा तिथे जास्त दर मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
वास्तविक १४ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होणाऱ्या कापसासाठी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाकडून चार तालुक्यात प्रत्येकी एक खरेदी केंद्र देणे आवश्यक होते. परंतू लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही त्यासाठी पुढाकार घेतला नाही.
एकही केंद्र नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना वाहतुकीचा भुर्दंड सहन करीत तेलंगणा गाठावे लागत आहे.