नववर्षातील सुख-समृद्धीसाठी भाविकांचे मंदिरांत साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 11:32 PM2018-01-01T23:32:18+5:302018-01-01T23:33:02+5:30
जिल्ह्यात नवीन वर्षाचा जल्लोष आधुनिक पद्धतीने साजरा होत असतानाच नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांनी जिल्हाभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करून नवीन वर्षात सुख-समृद्धी लाभू दे, असे साकडे देवाला घातले.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : जिल्ह्यात नवीन वर्षाचा जल्लोष आधुनिक पद्धतीने साजरा होत असतानाच नववर्षाच्या पहिल्या दिवशी धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांनी जिल्हाभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करून नवीन वर्षात सुख-समृद्धी लाभू दे, असे साकडे देवाला घातले. अनेक ठिकाणी कार्यक्रमही झाले.
गडचिरोली शहराच्या नजीक असलेल्या सेमाना देवस्थानात बजरंगबलीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी ९ ते १० वाजेपर्यंत मंदिरात भाविकांचा जनसागर उसळला. दिवसभर शहरासह परिसरातील भाविकांनी बजरंगबलीचे दर्शन घेऊन नवीन वर्षात सुख-समृद्धी लाभण्याची मागणी केली. आरमोरी नजीकच्या डोंगरीवर तसेच शहरातील माता मंदिर, विठ्ठल-रखुमाई मंदिर, साई मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
जोगीसाखरा नजीकच्या नदीकाठावर वसलेल्या शिव मंदिरात भगवान शंकराचेही दर्शन अनेक भाविकांनी घेतले. देसाईगंजातील माता वॉर्डातील मंदिरासह आमगाव येथेही भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली होती.
देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तीन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या अरततोंडी येथील महादेव गडावर निसर्गरम्य वातावरणाचा भाविकांनी अनुभव घेतला. सोबतच महादेवाचेही दर्शन घेतले. ऐतिहासिक गाव म्हणून ओळखल्या जाणाºया वैरागड येथील भंडारेश्वर देवस्थान, गोरजाई माता मंदिर, शिवमंदिर देवस्थानात भाविकांनी नवीन वर्षात दर्शन घेऊन नववर्षात शुभकामना केली. विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाºया श्री क्षेत्र मार्र्कंडादेव, आमगाव महाल, आष्टी नजीकच्या शिव मंदिर येथेही भाविकांची गर्दी उसळली होती.
अहेरी, भामरागड, सिरोंचात प्रवचन, यात्रा, शोभायात्रा
अहेरी येथील कन्यका माता मंदिरात तीन दिवसीय साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाला सोमवारपासून सुरूवात झाली. येथे बीड येथील साई कथाकार साई गोपाल देशमुख यांनी भाविकांना नवीन वर्षानिमित्त प्रवचन दिले. शिवाय येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर, संत मानवदयाल मंदिरातही भाविकांची गर्दी उसळली.
भामरागड तालुक्यातील बेजूर येथे ३० डिसेंबरपासून बाबलाई माता यात्रा महोत्सवास सुरूवात झाली. हा महोत्सव चार ते पाच दिवस चालणार आहे. नवीन वर्षानिमित्त बाबलाई देवीच्या दर्शनासाठी येथेही भाविकांनी गर्दी केली होती.
महाराष्टÑ- तेलंगणा सीमेलगत असलेल्या सिरोंचा येथील बालाजी मंदिरात धनुर्मास उत्सवाला प्रारंभ झाला असून महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी सिरोंचा शहरातून भगवान विष्णूचे वाहन गरूड यांची शोभायात्रा बालाजी मंदिरातून काढण्यात आली. सोमवारी नववर्षानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. ठिकठिकाणी अशा पद्धतीने परमेश्वराकडे साकडे घालण्यात आले.