८०० बेघरांना मिळाला तात्पुरता निवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 05:00 AM2020-04-02T05:00:00+5:302020-04-02T05:00:31+5:30
ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या शाळांमध्ये परजिल्ह्यातील नागरिकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या मागणीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी लागणारे किराणा सामानही पुरविण्यात आले आहे. संचारबंदीचा आदेश आहे तोपर्यंत त्यांची अशा पद्धतीने व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी व जिल्हाबंदीचा फटका बसलेले ८०० नागरिक सध्या जिल्ह्याच्या विविध भागात अडकून पडले आहेत. त्यांनी स्वगृही न जाता आहे तिथेच थांबावे असे आवाहन करून शासनाने त्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे सर्व तालुका प्रशासनाच्या वतीने त्या-त्या भागातील अशा बेघर नागरिकांच्या आश्रयाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ठिकठिकाणच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये, तर काही ठिकाणी नगर परिषदेच्या शाळांमध्ये परजिल्ह्यातील नागरिकांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या मागणीनुसार त्यांना स्वयंपाकासाठी लागणारे किराणा सामानही पुरविण्यात आले आहे. संचारबंदीचा आदेश आहे तोपर्यंत त्यांची अशा पद्धतीने व्यवस्था प्रशासनाकडून केली जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून जिल्ह्यात १४ हजार नागरिक दाखल झाले आहेत. त्यातील जवळपास ८०० नागरिक इतर जिल्ह्यातील आणि इतर राज्यातील आहेत. काही जण विविध कामानिमित्त या जिल्ह्यात आले तर काही जण लगतच्या तेलंगणा राज्यातून गोंदिया किंवा पलिकडच्या बालाघाट आणि छत्तीसगडमधील आपल्या गृह जिल्ह्यात जाण्यासाठी गडचिरोलीत पोहोचले आहेत. त्या सर्वांना प्रशासनाने विविध ठिकाणी आश्रय दिला आहे.
अधिकाऱ्यांची अशीही सहृदयता
उन्हाळी हंगामातील शेतीच्या कामासह इतर रोजगारासाठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील हजारो मजूर तेलंगणात जातात. पण कोरानासाठी लॉकडाऊन केल्यानंतर त्यांना गावाकडे जाण्यासाठी वाहन नसल्यामुळे अनेक लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून पायीत गावाकडे निघाले आहेत. रविवारच्या रात्री असेच एक कुटुंब गोंदियाकडे जाण्यासाठी गडचिरोलीच्या रस्त्याने जात होते. दिवसभर चालून ते थकून गेले होते. त्यांच्याकडे खाण्यासाठीही काही नव्हते. आपल्या वाहनातून जात असलेले गडचिरोलीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील मडावी यांची नजर त्यांच्यावर पडल्यानंतर त्यांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यात एक गरोदर महिलासुद्धा होती. डॉ.मडावी यांनी तहसीलदार महेंद्र गणवीर यांना सांगताच त्यांनी न.प.च्या शाळेत रात्री ११.३० वाजता त्यांची निवास व्यवस्था केली. एवढेच नाही तर डॉ.अनुपम महैशगोरी, आनंद मोडक यांच्या सहकार्याने स्वत:च्या घरून भोजन बनवून आणून त्यांची व्यवस्था केली.
४.३२ लाख लोकांना स्वस्त गहू-तांदळाचा लाभ
जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्यांची संख्या ४ लाख ३२ हजार आहे. या सर्वांना २ रुपये किलो दराने गहू तर ३ रुपये किलो दराने ३ तांदूळ वाटप केले जात आहे. अंत्योदयच्या लाभार्थ्याना प्रतिकार्ड १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ तर प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ दिले जात आहे. या सर्व लाभार्थ्यांना आता अतिरिक्त ५ किलो धान्य देण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नरेंद्र भागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
शाळेच्या आवारात पेटताहेत चुली
बेघर कुटुंबियांना ५ रुपयात शिवभोजन देऊन भोजन व्यवस्था करण्याचे शासनाचे निर्देश होते. परंतू मर्यादित ठिकाणी शिवभोजनाची व्यवस्था असल्याने ते आश्रयितांना पोहोचविणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना स्वयंपाकाचे साहित्यच देण्यात आले. त्यात गव्हाची कणिक, तांदूळ, तेल-तिखट, मीठ आदी सर्व साहित्य दिल्यामुळे अनेक ठिकाणी या आश्रयितांच्या चुली पेटताना दिसत आहेत.