दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या पंखांना 'लिफ्ट', 'नीट'चा डोंगर सर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 10:46 AM2023-06-16T10:46:54+5:302023-06-16T10:48:44+5:30
दहा जण होणार डॉक्टर, धाराशिवच्या मोफत वर्गाचा फायदा
गडचिरोली : अतिशय दुर्गम व नक्षल प्रभावित जिल्ह्यातील दहा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना धाराशिव येथील लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट संस्थेने ‘लिफ्ट' दिली आहे. त्यामुळे आदिवासी तरुण डॉक्टर बनून रुग्णसेवा करू शकणार आहेत. या संस्थेच्या ‘उलगुलान’ या निःशुल्क वर्गामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण मिळाले आहे. भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण व ७८ टक्के जंगलक्षेत्र असलेल्या गडचिरोलीतील अनेक गावे अद्यापही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अबुझमाड परिसर हा नक्षल्यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट संस्थेमुळे या ठिकाणचे विद्यार्थीही डॉक्टर बनू शकणार आहेत.
या लोकांपर्यंत अद्याप रस्ते, पाणी, आरोग्य सुविधाच पोहोचलेल्या नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थी उच्चशिक्षित होणे ही दुरापास्त बाब. ही बाब लक्षात घेऊन ‘लिफ्ट फॉर अप्लिफ्टमेंट’ संस्थेचे डॉ. अतुल ढाकणे आणि त्यांच्या चमूने मेळघाटसह गडचिरोली जिल्ह्यातील गरीब व गरजू आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे (नीट) मोफत निवासी वर्ग चालू केले. या वर्गाला ‘उलगुलान’ असे नाव देण्यात आले.
यावर्षीच्या वर्गातून जिल्ह्यातील दहा विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी (एमबीबीएस) पात्र झाले आहेत. यात राजू दुर्गम (टेकाडाताल्ला, ता. सिरोंचा), पुष्पा जाडी( चिंतादेवाला), आकाश कोडायामी( गावानहेट्टी, ता. गडचिरोली), रोहिणी मांजी (पल्ली, ता. भामरागड), सचिन अर्की (गोपनार, ता. भामरागड), सूरज पोदाडी (बिनागुंडाता,भामरागड), श्रुती कोडायामी (भामरागड), राकेश पोदाळी (तुरेमर्का, ता. भामरागड), अल्तेश मिच्छा (भामरागड), रेणुका वेलादी (अहेरी) यांचा समावेश आहे.
लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट संस्थेमार्फत मागील आठ वर्षांपासून पुणे व मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उस्मानाबाद येथे ‘उलगुलान’ हे स्वतंत्र मोफत निवासी वर्ग चालविले जातात. २०२०-२१ पासून गडचिरोलीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. ‘व्हिजन २०३०’ नुसार गडचिरोली व मेळघाटातून १०० एमबीबीएस डॉक्टर घडविण्यात येणार आहेत. पुढील बॅचची प्रवेश प्रक्रिया सुरू असून त्यासाठी नोंदणी सुरू आहे.
- डॉ. सिद्धिकेश तोडकर, कार्याध्यक्ष, लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट