दहा हजारांवर नवागतांचे होणार स्वागत
By admin | Published: June 26, 2017 01:02 AM2017-06-26T01:02:37+5:302017-06-26T01:02:37+5:30
जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजारांवर शाळा आहेत. या शाळांमध्ये शैक्षणिक सत्र
मंगळवारी शाळेची पहिली घंटा : प्रवेशोत्सवासाठी शिक्षण विभागाची सज्जता
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजारांवर शाळा आहेत. या शाळांमध्ये शैक्षणिक सत्र २०१७-१८ मध्ये इयत्ता पहिलीत एकूण १० हजार ४५५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. २७ जून रोजी यंदा शाळेची पहिली घंटा वाजणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी गावातून प्रभातफेरी काढून मंगळवारला या नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत करण्यात येणार आहे. जि. प. प्राथमिक शिक्षण विभागाची प्रवेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार प्रत्येक बालकाचे नाव पटावर नोंदविले जाणे आवश्यक आहे. पटावर नोंदविण्यात आलेले प्रत्येक बालक दररोज शाळेत उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा हक्क या कायद्याने मान्य केला आहे. दीर्घ सुट्यांच्या आनंदानंतर विद्यार्थी जेव्हा शाळेत येतील, त्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे, शाळा परिसर स्वच्छ, सुंदर व प्रेरणादायी असल्यास सुट्यानंतर बालकांना शाळेची ओढ लागेल तसेच यंदा प्रथमच इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेची आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने शाळा प्रवेशोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी मंगळवारला शाळेमध्ये आनंदी वातावरण राहणार आहे. शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम घेण्यासंदर्भात राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ९ जून २०१५ रोजी शासन निर्णय जारी केला आहे.
गावातून प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे. पाठ्यपुस्तक वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यात सहभागी होणार आहे.
विद्यार्थ्यांना भोजनात गोड पदार्थ मिळणार
शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव कार्यक्रमासोबतच इयत्ता पहिलीत दाखलपात्र विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना द्यावयाच्या भोजनात गोड पदार्थाचा समावेश करावा, असे शालेय शिक्षण विभागाने ९ जून २०१५ रोजी काढलेल्या जीआरमध्ये म्हटले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड पदार्थ खायला मिळणार आहे.
१३२ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवेश
जि. प. प्र्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सर्वच केंद्रांमध्ये वर्षातून पाच ते सहा वेळा शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम शिक्षक तसेच गटसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांमार्फत राबविली जाते. गडचिरोली जिल्ह्यात ६६ मुले व ६६ मुली अशी एकूण १३२ शाळाबाह्य विद्यार्थी शोधून काढण्यात आले. त्यांचा शाळांमध्ये प्रवेशही निश्चित झाला आहे. या विद्यार्थ्यांचेही मंगळवारी स्वागत होणार आहे.