मान्यतेशिवाय निविदा प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 12:54 AM2019-03-06T00:54:17+5:302019-03-06T00:55:00+5:30
नगर परिषद तसेच नगर पंचायतीमध्ये कोणत्याही विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी संबंधित कामाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही निविदा प्रक्रिया बोलविण्यात आल्याचा प्रकार गडचिरोली पालिकेत घडला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगर परिषद तसेच नगर पंचायतीमध्ये कोणत्याही विकास कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी संबंधित कामाला जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही निविदा प्रक्रिया बोलविण्यात आल्याचा प्रकार गडचिरोली पालिकेत घडला आहे.
घनकचरा व्यवस्थापनांतर्गत गडचिरोली शहराच्या सर्व १२ प्रभागांमध्ये नाली उपसा करून उपसलेला गाळ ट्रॅक्टरने डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचविण्याच्या कामासाठीची ई-निविदा प्रक्रिया गडचिरोली पालिकेने काढली. २३ फेब्रुवारीपासून तर २ मार्चपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत होती. नाली उपसा कामासाठी पालिकेकडे तीन निविदा प्राप्त झाल्या असल्याची माहिती आहे. वर्षभरासाठी सदर कामाची एकूण किंमत १ कोटी ५५ लाख ९६ हजार ३०६ रूपये आहे. शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या कंत्राटाची मुदत ३१ डिसेंबर २०१८ ला संपली. मात्र नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात न आल्याने या कंत्राटाला दोन महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली होती. या संदर्भात पालिका प्रशासनाने नोव्हेंबर महिन्यात ठरावही घेतला होता. आता सदर दोन महिन्यांची मुदतवाढ २८ फेब्रुवारी २०१९ रोजी संपली आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही शहराच्या सर्व वार्डातील नाली उपसा कामाची निविदा प्रक्रिया हाती घेतली आहे. तसेच जुन्या कंत्राटदाराला मुदतवाढ दिली आहे.
या कामाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया करून प्रस्ताव सादर केला आहे. नाली सफाईच्या कामाला जिल्हा प्रशासनाकडून दरवर्षीच मंजुरी मिळत असते. हे काम आरोग्याशी संबंधित असल्याने थांबविता येत नाही. याशिवाय सदर कामाच्या जुन्या कंत्राटदाराला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
- संजीव ओहोळ, मुख्याधिकारी, न.प.गडचिरोली