दारूविक्री बंदीसाठी तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:40 AM2019-09-17T00:40:23+5:302019-09-17T00:41:17+5:30
बंद असलेली गावातील दारूविक्री पुन्हा सुरू झाल्यामुळे मांगदा गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. गावातील दारूविक्री तत्काळ बंद करा अशा सूचना महिलांनी रॅलीच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांना दिल्या. एकेकाळी दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मांगदा गावात जानेवारी महिन्यात मुक्तिपथच्या पुढाकाराने महिलांचे संघटन उभे करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : बंद असलेली गावातील दारूविक्री पुन्हा सुरू झाल्यामुळे मांगदा गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला. गावातील दारूविक्री तत्काळ बंद करा अशा सूचना महिलांनी रॅलीच्या माध्यमातून दारू विक्रेत्यांना दिल्या.
एकेकाळी दारूविक्रीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या मांगदा गावात जानेवारी महिन्यात मुक्तिपथच्या पुढाकाराने महिलांचे संघटन उभे करण्यात आले. गावातील दारूविक्री पूर्णत: बंद होण्यासाठी महिला समोर आल्या. ग्रामसभेत दारूविक्री बंदीचा ठराव झाला. सातत्याने अहिंसक कृती करून दारूचे साठे महिलांनी नष्ट केले. परिणामी गावातील दारूविक्री पूर्णत: थांबली. पण गत काही दिवसात विक्रेत्यांनी पुन्हा डोके वर काढले. लपून छपून विक्री सुरू केली. याच दरम्यान गावात काही हिंसक घटनाही घडल्या. महिलांनी मुक्तिपथ तालुका चमूला याची माहिती दिली. गावातील दारूविक्री थांबविण्यासाठी बैठक घेण्यात आली. त्यानुसार नियोजन करून दारूविक्रेत्यांना समज देण्यासाठी शनिवारी महिलांनी जनजागृती रॅली काढली. ‘बंद करा बंद करा, दारूविक्री बंद करा, नही चलेगी नही चलेगी, दारूविक्री नही चलेगी’ अशा घोषणा महिलांनी दिल्या. महिलांच्या या घोषणांनी संपूर्ण गाव दणाणले.
पुनर्वसित चव्हेला गावलाही दिल्या सूचना
तुलतुली धरणात गेलेल्या चव्हेला गावाचे मांगदा गावाजवळ पुनर्वसन करण्यात आले आहे. चव्हेला हे गावही दारूविक्रीमुळे आधीच अनेक गावासाठी डोकेदुखी ठरले होते. पुनर्वसित झालेल्या लोकांनी नवीन जागेवरही दारूविक्री सुरू केली. परिणामी आसपासच्या गावांतील दारूबंदी प्रभावित होत आहे. त्यामुळे येथील दारूविक्री बंद व्हावी यासाठी चव्हेला येथील महिलांनी पुनर्वसित गावात जाऊन येथील विक्रेत्यांनाही समज देत दारूविक्री बंद करण्याच्या सूचना दिल्या. यातून महिलांनी एकजुटता दाखविली.