दहावी निकालात सरकार नापास, विद्यार्थी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:27 AM2021-06-02T04:27:19+5:302021-06-02T04:27:19+5:30
कोरोनामुळे दहावीचे सत्र २३ नोव्हेंबरला सुरू झाले. पुन्हा १५ फेब्रुवारीला वर्ग बंद करण्यात आले. अडीच महिनेच शाळा सुरू राहिली. ...
कोरोनामुळे दहावीचे सत्र २३ नोव्हेंबरला सुरू झाले. पुन्हा १५ फेब्रुवारीला वर्ग बंद करण्यात आले. अडीच महिनेच शाळा सुरू राहिली. त्यातही बस व वसतिगृह सुरू न केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत पोहोचू शकले नाही. अनेक पालकांनी कोरोनामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले नाही. आता परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापन व नववीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. ५० गुणांचे अंतर्गत मूल्यमापन राहणार आहे. त्यात दोन प्रकार करण्यात आले आहे, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा २० गुण राहणार असून गृहपाठ, सराव परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा मिळून ३० गुण राहणार आहेत. गेल्या वर्षी जे विद्यार्थी नववी पास झाले त्या निकालाच्या आधारावर ५० गुण आहेत. त्यातही गोंधळ म्हणजे विद्यार्थी व पालकांना मूल्यमापन पध्दत मान्य नसेल तर लेखी परीक्षा कोरोनानंतर घेण्यात येणार आहे. शंभरपैकी पाच विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे. असे म्हटल्यास निकाल राखीव ठेवणार का, निकाल जाहीर केला नाही तर पुढची प्रवेशप्रक्रिया पुढे ढकलणार का? या सत्रात अनेक विद्यार्थी शाळेतच येऊ शकले नाही तर अंतर्गत मूल्यमापन कसे करणार, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याला पर्याय म्हणून ऑनलाइन वर्ग घेण्यात आल्याचे शासनाचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात ऑनलाइन वर्गात नेटवर्कचा खोडा राहिलेला आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल तसेच नेटवर्क ही समस्या राहिली आहे. शहरी भागातील श्रीमंत पालकांच्या मुलांना गृहीत पकडण्यात आले. यात ग्रामीण भागातील विद्यार्थांची नोंदच घेण्यात आली नाही. उच्च न्यायालयात दाखल असलेल्या पिटीशनला उत्तर देण्यासाठी सरकारने आपली बाजू राखली तर नाही ना, अशी शंकादेखील कोहाडे यांनी उपस्थित केली आहे.