Corona Virus in Gadchiroli; कोरोनाच्या धास्तीने 'त्यांनी' नदीतच थाटला संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:19 PM2020-04-07T18:19:57+5:302020-04-07T18:20:30+5:30
कोरोना विषाणूपासून स्वत:च्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी भामरागड येथील अजय कालिपोत सरदार व संजय कालिपोत सरदार या दोन भावांनी थेट इंद्रावती नदी पात्रातच संसार थाटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोना विषाणूने जगभरात दहशत निर्माण केली आहे. या विषाणूपासून स्वत:च्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी भामरागड येथील अजय कालिपोत सरदार व संजय कालिपोत सरदार या दोन भावांनी थेट इंद्रावती नदी पात्रातच संसार थाटला आहे.
एकमेकांपासून अंतर पाळणे हा कोरोनाची बाधा होऊ न देण्याचा एकमेव उपाय आहे. घरातील सज्ञान व्यक्ती अंतर ठेवूनच वावरत असले तरी लहान मुलांना थांबविणे कठीण होते. भविष्यात कोरोनाची लागण झाल्यास उपचार करणे कठीण होईल. ही बाब लक्षात घेऊन संजय व अजय या दोघा भावांनी इंद्रावती नदी पात्रात कुटुंब हलविले आहे. नदीतील रेतीवर झाडाच्या फांद्यांचे मंडप उभारले आहे. नदीतील थंडगार हवा मन प्रसन्न करते. तसेच नदीचे पूर्ण पात्र हे मुलांसाठी अंगण आहे. त्यामुळे बच्चे कंपनीसुध्दा आनंदात आहे, अशी माहिती अजय व संजय यांनी लोकमतला दिली. कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी सामाजिक अंतर पाळण्याचे आवाहन सरकार, प्रशासन व माध्यमांद्वारे वेळोवेळी केली जात आहे. मात्र अनेकवेळा सुशिक्षीत नागरिकही अंतर पाळत नसल्याचे दिसून येते. अल्पशिक्षीत असलेल्या अजय व संजयला मात्र सामाजिक अंतराचे महत्त्व कळले. त्यामुळेच त्यांनी भामरागड येथील स्वत:चे राहते घर सोडून इंद्रावती नदीच्या पात्रात संसार थाटला आहे. त्यांनी घेतलेली दक्षता ही शहरी भागातील नागरिकांसाठी धडा आहे. २२ मार्चपासून हे कुटुंब नदी पात्रात संसार थाटून आहे.