बीएडकडे पाठ
By admin | Published: May 25, 2014 11:32 PM2014-05-25T23:32:14+5:302014-05-25T23:32:14+5:30
अद्यापक पदवी (बीएड्) अभ्यासक्रमाच्या (पूर्व परीक्षा) सीईटीचे पडघम वाजले असून २२ मे गुरूवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थी सीईटीचे ऑनलाईन
सीईटी परीक्षा : अर्ज भरण्याकडे कलच नाही गडचिरोली : अद्यापक पदवी (बीएड्) अभ्यासक्रमाच्या (पूर्व परीक्षा) सीईटीचे पडघम वाजले असून २२ मे गुरूवारपासून ऑनलाईन अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात विद्यार्थी सीईटीचे ऑनलाईन अर्ज भरताना दिसत नसल्याचे आढळून येत आहे. गतवर्षी गोंडवाना विद्यापीठातील अनेक बीएड् कॉलेजमध्ये निम्मेच प्रवेश झाल्याची माहिती आहे. नोकरीची कुठलही गॅरंटी नसल्याने विद्यार्थ्यांनी बीएड् अभ्यासक्रमाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येते. दोन वर्षापूर्वी नव्यानेच निर्माण झालेल्या गोंडवाना विद्यापीठांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात मिळून ३२ खासगी बीएड् कॉलेज आहे. गडचिरोली जिल्ह्यात १0 बीएड् कॉलेज आहेत. गतवर्षी गोंडवाना विद्यापीठांतर्गत असलेल्या चारच बीएड् कॉलेजमध्ये ७५ ते १00 टक्के प्रवेश झाले. तर उर्वरित कॉलेजच्या व्यवस्थापनाला ३५ ते ४0 टक्के प्रवेशावरच समाधान मानावे लागले. शासनाने विनाअनुदानित तत्वावर पाच-सहा वर्षापूर्वी राज्यभरात बीएड् व डीएड् कॉलेजची खैरात वाटली. या कॉलेजमधून दरवर्षी हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन बाहेर पळत होते. त्यामुळे बीएड् प्रशिक्षणार्थ्यांची संख्या भरमसाठ वाढली. परिणामी खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक शाळेतील दोन ते चार जागेसाठी शेकडो उमेदवार मुलाखतीला उपस्थित होऊ लागले. परिणामी खासगी संस्थांनी माध्यमिक शिक्षक पदासाठी भरमसाठ डोनेशन घेणे सुरू केले. यामुळे सर्वसामान्य गरीब होतकरू व हुशार बीएड् प्रशिक्षणार्थ्यांवर बेकारीची पाळी आली. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ७-८ वर्षापासून शेकडो बीएड् प्रशिक्षणार्थी शिक्षकाच्या नोकरीपासून वंचित असल्याचे दिसून येते. केवळ भरमसाठ डोनेशन देणार्या बोटावर मोजण्याइतक्याच बीएड् प्रशिक्षणार्थ्यांनी खासगी संस्थेत शिक्षक पदाची नोकरी बळकावली. सध्या तर अनेक शिक्षक पट पडताळणी दरम्यान अतिरिक्त ठरल्यामुळे समायोजनाची प्रक्रिया जिल्ह्यासह राज्यभरात सुरू आहे. परिणामी राज्य शासनाने अनुदानित माध्यमिक शाळातील शिक्षक भरतीवर बंदी आणली आहे. फक्त विनाअनुदानित शाळेतील शिक्षक भरतीला मान्यता आहे. गेल्या सात-आठ वर्षापासून अनेक बीएड् प्रशिक्षणार्थी थोड्याफार प्रमाणात खासगी संस्थेला डोनेशन देऊन विनाअनुदानित शाळांवर कार्य करीत आहेत. यांना नियमित मानधनही मिळत नसल्याने हे युवक हवालदिल झाले आहेत. शासनाकडून शाळांना अनुदान मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. विनाअनुदानित शाळेतील शिक्षक वेठबिगारीचे जीवन घालविता आहेत. टीईटीपात्र विद्यार्थ्यांची निराशा शासनाने उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षक पदाच्या भरतीचे गाजर दाखवून यावर्षीपासून नव्यानेच टीईटी परीक्षा घेण्यास सुरूवात केली. सदर परीक्षा आटोपून पाच महिन्याचा कालावधी लोटत आहे. या परीक्षेचा निकालही लागला. यात फारच कमी डीएड्, बीएड् प्रशिक्षणार्थी पात्र ठरले आहेत. मात्र शिक्षक पदाच्या भरतीच्या हालचाली शासनाकडून दिसून येत नाही. यामुळे टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या डीएड्, बीएड् विद्यार्थ्यांची घोर निराशा झाली आहे. पटपडताळणी मोहीमेत राज्यभरात अनेक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी आढळून आली. यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यांच्या समायोजनाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. यामुळे शिक्षकांची नवीन पदे निर्माण होण्याचे चिन्ह सध्या तरी दिसत नाही.