तेंदू लिलावांकडे ठेकेदारांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:33 PM2018-03-22T22:33:52+5:302018-03-22T22:33:52+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील वर्षातील सर्वात मोठा व्यवसाय असलेल्या तेंदूपत्त्यावर यावर्षी मंदीचे सावट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : गडचिरोली जिल्ह्यातील वर्षातील सर्वात मोठा व्यवसाय असलेल्या तेंदूपत्त्यावर यावर्षी मंदीचे सावट आहे. कोट्यवधीची उलाढाल असलेल्या या व्यवसायाकडे यावर्षी ठेकेदारांनी पाठ फिरविल्यामुळे ग्रामसभांपुढे आर्थिक संकट उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अहेरी उपविभागात तेंदुपत्ता व्यवसायावर आदिवासी नागरिकांचे वार्षिक आर्थिक नियोजन असते. मागील वर्षी तेंदूपत्त्याला खूप चांगला दर मिळाला. मजुरांना बोनसची चांगली रक्कमही मिळाली. ठेकेदार वृत्तपत्रात जाहीरात न येतासुध्दा स्वत: माहीती घेवुन लिलावाच्या दिवशी हजर राहायचे. यावर्षी मात्र उलट परस्थिती दिसत आहे.
बुधवारी तालुक्यातील तोडसा ग्रामपंचायतअंतर्गत तोडसा येथे तेंदूपत्ता लिलाव ठेवण्यात आला होता. याकरीता सरपंच, सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या सर्व गावातील नागरिक, तसेच ग्रामसेवक व पंचायत समीतीचे कर्मचारी उपस्थित होते. ग्रामस्त तब्बल दोन - अडीच तास ठेकेदारांची वाट पहात होते. परंतु एकही ठेकेदार न आल्याने शेवटी सरपंच प्रशांत आत्राम यांनी लिलावासाठी पुढची तारीख जाहीर केली.
लिलावाला ठेकदार येत नसल्यांचे चित्र याच वर्षी पहायला मिळत आहे. तेंदूपत्ता लिलाव न झाल्यांस गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी खरेदी केलेला तेंदुपत्ता गोदामात पडून आहे. तेंदू पत्त्यावर यावर्षी मंदीचे सावट आहे. जीएसटीसह शासनाच्या जाचक अटी, नोटाबंदी, पोलिसांची तेंदू ठेकेदारावरील कारवाई अशी अनेक कारणे आहेत. त्यामुळे यावर्षी तेंदू ठेकेदार तेंदुपत्ता लिवाव घेण्याची शक्यता कमीच आहे.
- अशोक मल्लेलवार,
तेंदू ठेकेदार, गडचिरोली