ठाकूरदेव यात्रेत उसळला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 10:30 PM2018-01-09T22:30:46+5:302018-01-09T22:31:22+5:30
तालुक्यातील सुरजागड पहाडावर ५ ते ६ जानेवारी दरम्यान सुरजागड ठाकूरदेव यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
आॅनलाईन लोकमत
एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड पहाडावर ५ ते ६ जानेवारी दरम्यान सुरजागड ठाकूरदेव यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या यात्रेला ग्रामसभांच्या पदाधिकाऱ्यांसह आदिवासी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. यात्रेतून आदिवासी बांधवांनी सांस्कृतिक परंपराही कायम राखली.
सदर यात्रेदरम्यान पहिल्या दिवशी सुरजागड ठाकूरदेवाची पारंपरिक पूजा करण्यात आली. रात्री पारंपरिक आदिवासी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. जल, जंगल, जमीन व संसाधनावरील ग्रामसभा तसेच आदिवासींचे अधिकार व हक्क यावर सभा घेण्यात आली. ग्रामसभांना शासनाने महत्त्वपूर्ण अधिकार दिल्याने ग्रामसभांनी गावाची प्रगती साधली पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यात्रेला प्रामुख्याने जि.प. सदस्य अॅड. लालसू नोगोटी, सुरजागड इलाका समितीचे प्रतिनिधी तथा जि.प. सदस्य सैनू गोटा जि.प. सदस्य संजय चरडुके, भामरागड पं.स. सभापती, सुखराम मडावी, पं.स. सदस्य शिला गोटा, सुरजागड ग्रामपंचायत प्रमुख कल्पना आलाम, भाकपाचे अमोल मारकवार, राहूल मेश्राम, पेरमिली इलाक्याचे प्रमुख बालाजी गावडे, सुरेंद्र हिचामी, झोडे आदींनी उपस्थिती दर्शवून ग्रामसभांना मौलिक मार्गदर्शन केले. तिसऱ्या दिवशी नैसर्गिक वस्तूंची पूजा करण्यात आली. त्यानंतर सूरजागड पहाडीवर चढून ठाकूरदेवाचे मुख्य पूजा करण्यात आली. सदर यात्रेतून आदिवासी बांधवांनी आदिवासी समाजातील सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक, प्रथा, परंपरा, बोलीभाषा आदींचे दर्शन घडविले. यात्रेला ७० गावातील नागरिक उपस्थित होते.