तंमुसने पुढाकार घेणे गरजेचे

By admin | Published: May 23, 2014 11:51 PM2014-05-23T23:51:25+5:302014-05-23T23:51:25+5:30

आधुनिक काळातील नवतरुण व्यसनाधिनतेकडे वळले आहेत़ त्यामुळे त्यांची अधोगती होत आहे़ सुशिक्षित तरुणांनी स्वत: पुढाकार घेऊन व्यसनाधिनता थांबविणे गरजेचे आहे़ ग्रामीण भागात अंधश्रेद्धेचे मूळ

Thamus should take the initiative | तंमुसने पुढाकार घेणे गरजेचे

तंमुसने पुढाकार घेणे गरजेचे

Next

जनजागृती आवश्यक : अनिष्ट रूढी, अंधश्रद्धेवर तंटामुक्ती हाच इलाज

देसाईगंज : आधुनिक काळातील नवतरुण व्यसनाधिनतेकडे वळले आहेत़ त्यामुळे त्यांची अधोगती होत आहे़ सुशिक्षित तरुणांनी स्वत: पुढाकार घेऊन व्यसनाधिनता थांबविणे गरजेचे आहे़ ग्रामीण भागात अंधश्रेद्धेचे मूळ खोलवर गेले आहेत. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून ताबा मिळविता येऊ शकतो, त्यासाठी तंटामुक्त मोहिमेतून जनजागृती करून अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे़ आजची तरुण पिढी शिक्षण तथा स्पर्धा परीक्षेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे़ ग्रामीण भागासह शहरी भागातीलही तरूण व्यसनाच्या गर्तेत अडकले आहेत. व्यसनाकडे तरुणवर्ग वळल्यामुळे त्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे़ राष्टÑसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांनी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रचार केला. कमावलेला पैसा सत्कारणी लागला तर तरुण पिढीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते़ सध्या तरुण वर्ग व्यसनाधिनतेकडे वळल्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तरूण पिढीला व्यसनमुक्त करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेतून पुढाकार घेतला जाऊ शकतो. २००६ पासून राज्यात तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात येत आहे़ या अभियानामुळे देसाईगंज तालुक्यातील काही गावांमध्ये दारूबंदी करण्यात आली़ सुरूवातीच्या काळात दारूबंदीला गावातून चांगला प्रतिसाद मिळाला. गावातील महिलांनीसुध्दा तंटामुक्त समितीच्या माध्यमातून दारू बंदीला पाठींबा दिला़ मात्र कालांतराने गावातील तंट्याच्या वातावरणात दारूबंदीकडे तंटामुक्त समित्यांनी पाठ फिरविली़ हल्ली संपूर्ण जिल्ह्यात तंटामुक्त समितीच्यासमक्ष मोठ्याप्रमाणात दारूचा व्यवसाय फोफावत चालला आहे. काही ठिकाणी तर या समितीच्या पदाधिकार्‍यांना हप्तेवारी पैसे मिळत असल्याचीही चर्चा अनेक गावांमध्ये ऐकायला मिळत आहे. काही गावांमध्ये महिलांच्या पुढाकाराने दारूबंदीची चळवळ यशस्वी झाली आहे़ मात्र गावातील राजकारणाने तंटामुक्त समितीच्या नवनवीन पदाधिकार्‍यामुळे दारूबंदीचे वाभाडे निघाले आहेत. त्यामुळेच व्यसनाधिनतेकडे वळलेल्या ग्रामीण तरुणांना व्यसनमुक्तीसाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांपुढे आहे. ग्रामीण भागातील वाढलेली अंधश्रध्दा आणी अनिष्ट चालीरीती, रूढी-पंरपरा केवळ तंटामुक्त समितीच्या पुढाकारातून दूर होऊ शकतात़ तंटामुक्त समितीची कार्यकारिणी दरवर्षी घोषित केली जाते. परंतु कार्यकारिणी घोषित करतांना अध्यक्षपदावरून वाद निर्माण होण्याच्या घटनाही अनेकदा घडलेल्या आहेत. त्यामुळे तंटामुक्तीसाठी स्थापन होणारी समिती स्वत:च तंट्याला सामोरे जाते. तंटामुक्ती समिती गठीत करतांना तंटे होऊ नये यासाठी गावपातळीवर विचारमंथन होणे आवश्यक आहे. बहुतेक तंटामुक्त समित्या दारूबंदी व अंधश्रंध्देसाठी प्रयत्नरत आहेत़ मात्र गावातील सर्वसामान्याकडून या बाबतीत गती देण्यासाठी सुशिक्षित वर्गानेसुद्घा पुढाकार घेणे गरजेचे आहे. व्यसनमुक्ती व अंधश्रध्दा निवारणाला गती देणारी चळवळ उभारली तर तंटामुक्ती समित्यांना बळकटी प्राप्त होऊ शकते. गावपातळीवर तंटामुक्त समित्यांचा वचक कायम राहण्यासाठी पोलिसांचेही सहकार्य महत्वाचे आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्यांचा दरारा गावात राहू शकेल या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक आहे. (वार्ताहर)

Web Title: Thamus should take the initiative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.