१४२ किमीच्या महामार्गाने येणार ‘समृद्धी’, जिल्ह्याची वाढणार कनेक्टिव्हिटी
By दिलीप दहेलकर | Published: December 31, 2023 08:39 PM2023-12-31T20:39:07+5:302023-12-31T20:39:45+5:30
राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ६०० किमीमध्ये लांबीच्या अंतरात पूर्ण झाला असून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.
गडचिराेली : राज्याची राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर पर्यंत ६०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आता भंडारा ते गडचिरोली या दुसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाच्या अंतिम आखणीस मान्यता प्रदान करण्यात आली असून राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत या महामार्गाचे काम करणार आहे. रेल्वे मार्ग, राष्ट्रीय महामार्ग, सुरजागड लाेहप्रकल्प व आता समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून जिल्हा विकासाकडे गतीने झेपावत आहे. शेवटच्या टोकावरील मागास गडचिरोली आतापर्यंत उद्योगविरहित जिल्हा म्हणून परिचित होता, पण आता मोठमोठे प्रकल्प येत आहेत.
राज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ६०० किमीमध्ये लांबीच्या अंतरात पूर्ण झाला असून वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. उर्वरित लांबीचा महामार्गही लवकरच वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या पुर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्याच्या दृष्टीने, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार नागाूर पासून भंडारा ते गडचिराेलीपर्यंत करण्याचे नियाेजन हाेते.
राज्याच्या पुर्व विभागातील भंडारा गाेंदिया, गडचिराेली व चंद्रपूरपर्यत करण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यात आले आहे. सदर द्रुतगती महामार्गाचा विकास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हाती घेण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने २७ डिसेंबर २०२३ रोजी परीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.
दळणवळण व पर्यटन विकासाला मिळणार चालना
नागपूर, भंडारा ते गडचिराेली अशा समृद्धी महामार्गाने गडचिराेली जिल्हयात दळणवळण व पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे.
सदर मार्ग करण्याचा मुख्य उद्देश नागपूर शहराला गडचिरोली, भंडारा आणि पुढे मुंबईशी प्रवेश राज्याचा नियंत्रित द्रुतगती महामार्गाने जोडणे, राज्याच्या पूर्व आणि पश्चिम सीमांना द्रुतगती महामागनि जोडणे, हिंदू देशाच्या उत्तर आणि ईशान्येकडील मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांशी ठाकरे द्रुतगती महामार्गाद्वारे आंतरराज्यीय संपर्क स्थापित करणे हा आहे. पूर्व महाराष्ट्रातील अल्प विकसित जिल्ह्यांचा सामाजिक आर्थिक विकास होईल. पायाभूत सुविधांचा लाभ आदिवासी भागाचा विकास करण्यासाठी हाेणार आहे.
असे जाणार मार्ग
'भंडारा - गडचिरोली - १४२ किलोमीटर
नागपूर चंद्रपूर - १९४ किलोमीटर
नागपूर - गोंदिया - १६२ किलोमीटर
दाेन मार्ग आरमाेरीत जाेडणार
दुग्गीपार - काेरेगाव - गाेंदिया हा ७५३ क्रमाकांचा ४४ किमीचा राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आला आहे. याच धर्तीवर भंडारा - गाेंदिया व देसाईगंज ते आरमाेरी असा समृद्धी महामार्ग तयार करण्यात येणार आहे. दुसरीकडे नागपूरपासून भंडारा ते गडचिरोली हा समृद्धी महामार्ग तयार करण्यात येणार आहे. सदर दाेन्ही समृद्धी महामार्ग आरमाेरी येथे जाेडून ताे पुढे गडचिराेलीला जाेडणार आहे, अशी माहीती आमदार डाॅ. देवराव हाेळी यांनी ‘लाेकमत’ शी बाेलताना दिली.