जिल्ह्यात कोरोनाच्या निर्बंधात प्रशासनाने दिली शिथिलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2022 05:00 AM2022-02-02T05:00:00+5:302022-02-02T05:00:28+5:30
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद अधिकृत माहितीनुसार, लसीकरणाची टक्केवारी विचारात घेऊन दर आठवड्याला अद्ययावत केली जाणार आहे. सध्याच्या लसीकरणाचे प्रमाण पाहता जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी संजय मिना यांनी १ फेब्रुवारी २०२२ च्या मध्यरात्रीपासून नवीन नियमावली लागू केली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हा प्रशासनाचे कोरोनाच्या निर्बंधांमध्ये बदल केला आहे. यापूर्वीच्या आदेशात लागू केलेल्या काही निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी झालेले नसले तरीही लसीकरणाचे वाढलेले प्रमाण पाहता ही शिथिलता देण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्यात व जिल्ह्यात कोविड-१९ ओमायक्रॉन विषाणूचे झपाट्याने संक्रमण होत आहे. सदर साथरोगासंदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काही नियमावली व उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. दरम्यान, ३१ जानेवारीच्या शासन आदेशामध्ये लसीकरणाच्या मापदंडानुसार जिल्ह्याचे वर्गीकरण करण्यात आले. ज्या जिल्ह्यांमध्ये ३० जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांमध्ये पहिल्या डोसचे प्रमाण ९० टक्केपेक्षा जास्त आहे, तसेच दोन्ही डोसचे प्रमाण ७० टक्के आहे, अशा जिल्ह्यांकरिता निर्बंधांमध्ये अतिरिक्त शिथिलता देण्यात आलेली आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद अधिकृत माहितीनुसार, लसीकरणाची टक्केवारी विचारात घेऊन दर आठवड्याला अद्ययावत केली जाणार आहे. सध्याच्या लसीकरणाचे प्रमाण पाहता जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकारी संजय मिना यांनी १ फेब्रुवारी २०२२ च्या मध्यरात्रीपासून नवीन नियमावली लागू केली आहे.
काही गोष्टींमध्ये सूट मिळाली असली तरी ही सूट ८ जानेवारी २०२२ च्या राज्य सरकारच्या आदेशाच्या परिशिष्ट २ च्या अनुषंगाने कोविड योग्य वर्तनाच्या काटेकोर पालनाच्या अधीन राहून लागू राहणार आहे.
सदर आदेशात नमूद नसलेल्या इतर बाबींकरिता यापूर्वी लागू असलेल्या तरतुदी अंमलात असतील. या आदेशाचे पालन न करणारी/उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंडसंहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानून नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नवीन आदेशामुळे यात मिळेल सूट
मनोरंजनाची स्थळे, जसे उद्याने, बागबगिचे, पर्यटन, प्रेक्षणीय स्थळे ही नियमित वेळेनुसार ऑनलाइन तिकिटासह खुली राहतील. सर्व पर्यटकांना पूर्णपणे लसीकरण करणे आवश्यक राहणार आहे. कोविड-१९ साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांना कोणत्याही वेळी त्या स्थळांच्या परवानगी देण्याच्या संख्येवर वाजवी निर्बंध लावता येईल.
जिल्ह्यातील स्पा ठिकाणे ५० टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल, दररोज रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत सदर दुकाने बंद असतील. कोविड अनुरूप वर्तन / निर्देश / नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. तथापि सदर ठिकाणांमध्ये एसीचा वापर करता येणार नाही.
अंत्यविधीकरिता कमाल उपस्थितीची मर्यादा काढण्यात आली आहे. अंत्यविधीकरिता यापुढे पुढील आदेशापर्यंत कमाल उपस्थितीची मर्यादा राहणार नाही. मात्र, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन गर्दी टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.