गोदाकाठच्या शेतीचे झाले वाळवंट.. ना पीक हाती आले, ना मिळाला मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2022 01:54 PM2022-11-03T13:54:49+5:302022-11-03T13:56:59+5:30
अंकिसा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला वाळवंटाचे स्वरूप
महेश आगुला
अंकिसा (गडचिरोली) : यावर्षीच्या पावसाने, धरणांमधील पाण्याच्या विसर्गामुळे आणि तेलंगणा सरकारच्या मेडिगड्डा बॅरेजमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने सिरोंचा तालुक्यात हाहाकार उडाला. अनेक गावे आणि शेती जलमय झाली होती. पूर ओसरल्यानंतर शेतात पीक आणि माती गायब होऊन त्या ठिकाणी केवळ वाळू शिल्लक आहे. गेलेल्या पिकाचा किंवा खराब झालेल्या शेतजमिनीचा कोणताही मोबदला अद्याप या भागातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही.
गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बनविलेल्या मेडिगड्डा बॅरेजच्या ८५ गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पुराचे पाणी अंकिसा परिसरातील अनेक गावांत शिरले होते. अनेकांना गाव सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. काठावरील शेकडो हेक्टर शेतात पुराचे पाणी शिरले होते. त्या पाण्यासाठी वाहून आलेली वाळू शेतात सर्वत्र पसरली आहे. अंकिसा परिसरातील १४ शेतकऱ्यांच्या शेतीला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. शेतात दोन ती तीन फूट वाळूचा थर जमा झाल्याने त्यांना सध्या कोणतेही पीक घेणे अशक्य झाले आहे.
महसूल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी शेतीचे पंचनामे करून ३ महिने झाले, पण शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. आम्ही आमच्या कुटुंबांचे पालनपोषण कसे करायचे? शेतकऱ्यांना लवकर मदत देऊन दिलासा द्यावा.
- श्रीनिवास गंजी, शेतकरी, अंकिसा