जिल्हाभर गुंजला हर हर ‘महादेव’चा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 05:00 AM2022-03-02T05:00:00+5:302022-03-02T05:00:48+5:30

महाशिवरात्रीच्या पर्वावर वैरागड किल्ल्यावर कलावंतांनी शिव-पार्वतीच्या वेशभूषेत फोटोशूट केले. पौराणिक कथांमधील पात्रांना हुबेहूब साकारणाऱ्या त्यांचे छायाचित्र चर्चेचा विषय झाले. यात पार्वतीची वेशभूषा नुकत्याच एका टीव्ही रियलिटी शोमधील विजेत्या मनीषा मडावी हिने, तर महादेवाची वेशभूषा चातगावच्या सतीश कोवे याने साकारली. मेकअप आर्टिस्ट शीतल मेश्राम यांना त्यांना शिव-पार्वतीचे रूप दिले, तर दीपक दुधे व पीयूष चंद्रगिरे यांनी त्यांना कॅमेराबद्ध केले.

The alarm of 'Mahadev' resounded throughout the district | जिल्हाभर गुंजला हर हर ‘महादेव’चा गजर

जिल्हाभर गुंजला हर हर ‘महादेव’चा गजर

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : महाशिवरात्रीनिमित्त जिल्हाभरातील शिवमंदिरात पहिल्या दिवशी मंगळवारला भाविक भक्तांनी माेठ्या संख्येने गर्दी करून पूजाअर्चा केली. काेराेनाचे निर्बंध असले तरी याला फारसा प्रतिसाद न देता भाविकांनी शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसरासह जिल्हाभर ‘हर हर महादेव’चा गजर दिसून आला.

वैरागडच्या किल्ल्यात अवतरले शंकर-पार्वती

महाशिवरात्रीच्या पर्वावर वैरागड किल्ल्यावर कलावंतांनी शिव-पार्वतीच्या वेशभूषेत फोटोशूट केले. पौराणिक कथांमधील पात्रांना हुबेहूब साकारणाऱ्या त्यांचे छायाचित्र चर्चेचा विषय झाले. यात पार्वतीची वेशभूषा नुकत्याच एका टीव्ही रियलिटी शोमधील विजेत्या मनीषा मडावी हिने, तर महादेवाची वेशभूषा चातगावच्या सतीश कोवे याने साकारली. मेकअप आर्टिस्ट शीतल मेश्राम यांना त्यांना शिव-पार्वतीचे रूप दिले, तर दीपक दुधे व पीयूष चंद्रगिरे यांनी त्यांना कॅमेराबद्ध केले.

पळसगाव महादेवगड मंदिरात  महापूजा

आरमोरी : तालुक्यातील पळसगाव (अरततोडी)  महादेव गडावर  महाशिवरात्रीनिमित्त घटस्थापनेच्या निमित्ताने देसाईगंज पंचायत समितीचे माजी सभापती परसराम टिकले  यांच्या हस्ते महादेव मंदिरात  सपत्नीक महापूजा करण्यात आली.  पळसगाव येथील निसर्गरम्य परिसरात डोंगरावर महादेवाचे मंदिर उभारण्यात आले असून, दरवर्षी महाशिवरात्रीला भाविक भक्तांचा ओघ  या मंदिराकडे वळत असतो.  यावर्षी सुद्धा महाशिवरात्रीला महादेव मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी  देसाईगंज वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कुळमथे,  देवस्थानचे अध्यक्ष पुंडलिक घोडाम, उपाध्यक्ष श्रीराम ठाकरे, रेवनाथ चव्हारे, गणेश मातेरे, दिलीप घोडाम,  रामजी मानकर,  दिवाकर राऊत,  शारदा टिकले,  शारदा बागरकर,  धनश्री टिकले, संगीता सोनवाने,  जयंती सारगी  आदी मान्यवर उपस्थित होते.

चपराळात हजारो भाविकांनी घेतले समाधी व महादेवाचे दर्शन

आष्टी : चपराळा येथे कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळून हजारो भाविकांनी कार्तिकस्वामी महाराज यांच्या समाधीचे तसेच महादेवाचे दर्शन घेतले. पहाटे प. पू. संत श्री कार्तिकस्वामी महाराज यांच्या समाधीचा अभिषेक व पूजा तसेच महाशिवरात्री यात्रेचे उद्घाटन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर पंदिलवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर हळूहळू भाविकांची गर्दी होऊ लागली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदिराच्या गाभाऱ्यात  स्वयंसेवक ठेवण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने नागरिकांना आत सोडण्यात येत होते. प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवले होते. प्रत्येक भाविकाला मास्क लावण्यास सांगितले जात होते. गाभाऱ्यातील मूर्तीजवळ पोलीस तैनात करण्यात आले होते. ते नागरिकांना गर्दी होऊ नये म्हणून सूचना देत होते. महाशिवरात्रीनिमित्त आमदार डॉ. देवराव होळी यांनी समाधीचे व महादेवाचे दर्शन घेतले. तसेच अहेरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनीही चपराळा येथे भेट देऊन समाधीचे दर्शन घेतले व  यात्रेची पाहणी केली. एस. टी. महामंडळातर्फे बस सोडण्यात आल्या होत्या. परंतु, प्रशासनाने यात्रेवर निर्बंध घातल्याने असंख्य भाविक दर्शनाला येऊ शकले नाहीत. त्यामुळे बसेसमध्ये भाविकांची गर्दी नव्हती. प्राथमिक आरोग्य केंद्र, मार्कंडातर्फे वैद्यकीय अधिकारी डॉ. भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली  भाविकांना रुग्णसेवा दिली जात आहे. आष्टी पोलीस ठाण्याचे निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नियंत्रणात पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  यावर्षी यात्रेमध्ये दरवर्षीपेक्षा कमी दुकाने लागली होती. या यात्रेतील व्यवस्थेवर  देवस्थान कमिटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर पंदिलवार, सचिव विठ्ठल गारसे,  उपाध्यक्ष कवडू कुंदावार, शंकर पवार, संचालक  दीपक मादुरवार, पुंडलिक निखाडे, मधुकर धानोरकर, सुधाकर बत्तुलवार, दामोदर जीवतोडे, डॉ. माधव नलोडे, एस. नायर आदी लक्ष ठेवून होते.

वांगेपल्ली येथे उसळली भाविकांची गर्दी

अहेरी : तालुका मुख्यालयापासून २ किमी अंतरावरील महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या वांगेपल्ली येथील शिव मंदिरात असंख्य भाविकांची गर्दी उसळली. भाविकांनी प्राणहिता नदीपात्रात आंघोळ करून शिवलिंगाची पूजा केली. याठिकाणी महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यातून भाविकांनी येऊन दर्शन घेतले. प्रशासनाने जरी जत्रेवर बंदी घातली होती मात्र भाविकांनी दर्शन घेऊन पूजा अर्चा केली. अहेरी जिल्हा कृती समिती अहेरी तर्फे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. तसेच अहेरीवरून काळीपिवळी टॅक्सी, ऑटो व खासगी वाहनाने नागरिक वांगेपल्ली येथे पाेहाेचले. छोट्या दुकानदारांनी आपले दुकाने लावले होते त्यामुळे अनेक छोट्या दुकानदारांना रोजगार मिळाला.

 

Web Title: The alarm of 'Mahadev' resounded throughout the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.