सती नदीवरील पर्यायी रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

By संजय तिपाले | Published: July 4, 2024 02:00 PM2024-07-04T14:00:24+5:302024-07-04T14:01:27+5:30

दोन्ही बाजूला बॅरिकेट लावून रहदारी बंद: कुरखेडा तालुक्याशी तुटला सात गावांचा संपर्क

The alternative road on the river Sati was washed away in the first rain | सती नदीवरील पर्यायी रस्ता पहिल्याच पावसात गेला वाहून

The alternative road on the river Sati was washed away in the first rain

गडचिरोली : कुरखेडा शहराजवळील सती नदीवर नव्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे नदीपात्रातून पर्यायी रस्ता केला होता. मात्र, पहिल्याच पावसात हा रस्ता ४ जुलैला सकाळी साडेनऊ वाजता वाहून गेला, त्यामुळे सात गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दोन्ही बाजूला बॅरिकेटींग करुन प्रशासनाने रहदारी बंद केली आहे.
 

ब्रम्हपुरी ते देवरी राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या मार्गावरील कुरखेडातील सतीनदीत जुन्या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी नदीपात्रातच पर्यायी रस्ता तयार केला होता.  मात्र, या मार्गावर ऐन मधोमध पाण्याच्या प्रवाहाने भगदाड पडले. त्यामुळे  वाहतूक ठप्प झाली आहे. नदीपलीकडील गोठणगाव,जांभुळखेडा,येरंडी,मालदूगी, चांदागड,सोनसरी,शिवणी आदी गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे.  या मार्गावरून मोठ्या संख्येत शालेय विद्यार्थी,रूग्ण, शासकीय कार्यालयीन कामाकरीता नागरिक,चाकरमानी तसेच  दूध पूरवठा करणारे शेतकरी ये- जा करतात, त्या सर्वांची अडचण झाली आहे.    या मार्गावरील बस वाहतूक तसेच खाजगी प्रवासी वाहतूकही बंद आहे.  
   

रस्ता वाहून गेल्याची वार्ता पसरताच नागरिकांची नदीच्या दोन्ही तीरावर  मोठी गर्दी झाली होती. यावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये नये म्हणून कुरखेडा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिनेश गावंडे यांच्या नेतृत्वात मोठा पोलिस बंदोबस्त   तैनात करण्यात आला आहे . तसेच दोन्ही बाजूला खड्डा खोदून व बॅरिकेट लावून मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.   

 

दिरंगाईचा फटका
नवनिर्मित पुलाच्या बांधकामात झालेली दिरंगाई व नियोजन शून्यतेचा फटका तालुकावासीयांना बसत आहे.   बांधकामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या पुलाचे काम जलदगतीने झाले असते तर पावसाळ्यात नागरिकांची तारांबळ टळली असती. मात्र, आता दिरंगाईमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 

Web Title: The alternative road on the river Sati was washed away in the first rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.