घातपाताचा डाव उधळला, नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके जप्त

By संजय तिपाले | Published: September 24, 2023 12:10 PM2023-09-24T12:10:59+5:302023-09-24T12:11:33+5:30

बेडगाव जंगल परिसरात पोलिसांची कारवाई, सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कुरापती सुरुच

The ambush plan was foiled, the explosives buried in the ground by the Naxalites were seized | घातपाताचा डाव उधळला, नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके जप्त

घातपाताचा डाव उधळला, नक्षल्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेली स्फोटके जप्त

googlenewsNext

गडचिरोली: माओवादी संघटनेच्या सप्ताहानिमित्ताने नक्षलवाद्यांच्या कुरापती सुरु आहेत. कोरची तालुक्यातील बेडगाव घाट जंगल परिसरात घातपाती कारवायासाठी नक्षल्यांनी जमिनीत स्फोटके गाडून ठेवली होती, परंतु पोलिसांनी नक्षलविरोधी अभियानात ही स्फोटके जप्त करुन कट उधळून लावला. २३ सप्टेंबरला विशेष पथकाने ही कारवाई केली. 

माओवादी संघटनेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त २१ सप्टेंबरपासून  सप्ताहाला सुरु झाली. या पार्श्वभूमीवर नक्षलवादी ॲक्टीव्ह मोडवर आहेत. सप्ताह सुरु हाेण्याच्या दोन दिवस आधी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना धमकीचे पत्रक, नंतर सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भामरागडमध्ये हिंदेवाडा रस्त्यावर पोस्टर लावून नक्षल्यांनी उघड आव्हान दिले होते. दरम्यान, कोरची तालुक्यातील बेडगाव घाट जंगल परिसरात घातपाताच्या उद्देशाने जमिनीत स्फोटके पुरुन ठेवली होती, ही स्फोटके विशेष पथकाने २३ सप्टेंबरला जप्त केली. कुरखेडा उपविभागांतर्गत बेडगाव पोलिस मदत केंद्र हद्दीत पुराडा पोलिस ठाण्यातील जवान नक्षलविरोधी अभियान राबवित होते.

कोरची व टिपागड दलमच्या माओवाद्यांनी पोलिस पथकांना नुकसान पोहोचवून मोठा घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात स्फोटके व इतर साहित्य पुरुन ठेवले असल्याची माहिती मिळाल्यावर डीएसएमडी उपकरणाद्वारे जंगल परिसरात शोधमोहीम राबवली. त्यानंतर एक संशयित जागा मिळून आल्यानंतर बीडीडीएस पथकाला पाचारण केले. पाहणी केली असता घटनास्थळी जमिनीत अंदाजे दीड ते दोन फूट खोल स्फोटक पदार्थ भरुन असलेले पांढऱ्या मळकट रंगाचे ४ पाऊच मिळून आले. त्यात ११.८ किलो स्फोटके आढळून आली.  पोलिस अधीक्षक नीलोत्पल , अपर अधीक्षक (अभियान) अनुज तारे , कुमार चिंता, यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक साहिल झरकर यांच्या नेतृत्वात  पुराडाचे ठाण्याचे सहायक निरीक्षक भूषण पवार व जवानांनी ही कारवाई केली. बेडगाव ठाण्यात गुन्हा नोंद केला असून तपास उपनिरीक्षक लक्ष्मण अक्कमवाड करीत आहेत.

जमिनीत पुरुन ठेवलेली स्फाेटके हाती लागल्याने नक्षल्यांचा डाव उधळून लावण्यात यश आले. विशेष पथकाचे यात मोठे योगदान आहे. या परिसरात  नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. - नीलोत्पल, पोलिस अधीक्षक

Web Title: The ambush plan was foiled, the explosives buried in the ground by the Naxalites were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.