नक्षल्यांचा घातपाताचा डाव उधळला; जंगलात पेरून ठेवलेली स्फोटके नष्ट, लपविलेले साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2022 10:28 AM2022-10-13T10:28:05+5:302022-10-13T10:36:44+5:30
नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळल्या गेला.
गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या पोलीस दलाच्या जंगलातील भ्रमणमार्गावर स्फोटके पेरून घातपात घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळल्या गेला. यात जमिनीखाली पेरलेली स्फोटके जागेवरच नष्ट करण्यात आली, तर स्फोटकांसाठी वापरले जाणारे इतर साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी नक्षलविरोधी अभियान पथकातील जवान दुपारी कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या मालेवाडा पोलीस केंद्राच्या हद्दीतील लडुडेरा (हेटळकसा) जंगल परिसरात अभियान राबवीत असताना नक्षलवाद्यांनी स्फोटके पेरून ठेवल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करून शोधमोहीम राबविली असता एका संशयित ठिकाणी लपवून ठेवलेली स्फोटके आणि इतर साहित्य शोधण्यात जवानांना यश आले. नक्षलवादी विविध घातपाती, हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर करतात. हे साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहोचविण्याच्या उद्देशाने गोपनीयरीत्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरून ठेवतात.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले.
जागेवरच केला जमिनीतील बॉम्बचा स्फोट
जमिनीत २ जिवंत कुकर बॉम्ब, २ क्लेमोर बॉम्ब, १ नग पिस्टल, २ नग वायर बंडल आणि पाणी साठविण्याचा एक नग, जर्मन गंज, आदी साहित्य नक्षल्यांनी जमिनीत लपवून ठेवले होते. स्फोटकांनी भरलेले २ कुकर आणि २ क्लेमोर हे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाच्या मदतीने अत्यंत सतर्कपणे जागेवरच नष्ट करण्यात आले. इतर साहित्य गडचिरोली येथे आणण्यात आले.