रानटी हत्तीला पिटाळण्यासाठी गेला अन् जीव गमावला; गडचिराेली तालुक्यातील घटना
By गेापाल लाजुरकर | Published: November 25, 2023 11:12 PM2023-11-25T23:12:16+5:302023-11-25T23:12:48+5:30
रानटी हत्तींकडून धान पिकाचे नुकसान हाेऊ नये यासाठी हत्तींना जंगलाच्या दिशेने पिटाळण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले.
गडचिराेली : रानटी हत्तींकडून धान पिकाचे नुकसान हाेऊ नये यासाठी हत्तींना जंगलाच्या दिशेने पिटाळण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला आपले प्राण गमवावे लागले. दबा धरून बसलेल्या हत्तीने डांबरी रस्त्यावर शेतकऱ्यास चिरडून ठार केले. ही घटना तालुक्यातील मरेगावजवळ २५ नाेव्हेंबरला रात्री ८ वाजता घडली.
मनाेज प्रभाकर येरमे (३८) रा. मरेगाव असे हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. चांभार्डा व मरेगाव परिसरात गेल्या १० दिवसांपासून रानटी हत्तींचा धुडगूस सुरू आहे. यातच आपल्या पिकाचे संरक्षण व्हावे यासाठी मनाेज येरमे हे शनिवारी सायंकाळी अन्य शेतकऱ्यांसह शेताकडे गेले हाेते. दरम्यान वडधा-माैशिखांब मार्गालगतच रानटी हत्तींचा कळप वावरत हाेता. याच वेळी येरमे हे सायकलने घराकडे परत येत असतानाच हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला व डांबरी रस्त्यावरच त्यांना चिरडले. यात येरमे यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. चांभार्डा व मरेगाव भागात हत्तींनी गेल्या आठवडाभरापासून अक्षरश: धुडगूस घातला असून शेकडाे शेतकऱ्यांच्या धान पिकाचे माेठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
तीन महिन्यात तिसरा बळी
रानटी हत्तींनी गेल्या तीन महिन्यात तिघांचा बळी घेतला. यापूर्वी १६ सप्टेंबर राेजी आरमाेरी तालुक्याच्या पळसगाव परिसरात सहायक वनसंरक्षकांचे वाहनचालक सुधाकर आत्राम यांना तर १७ ऑक्टाेबर राेजी गडचिराेली तालुक्यातील दिभना येथील हाेमाजी गुरनुले या शेतकऱ्याला हत्तीने चिरडून ठार केले हाेते. त्यानंतर आता मरेगाव येथे मनाेज येरमे यांना हत्तीने चिरडून ठार केले.