कोरची काँग्रेसकडे, भामरागडात भाजपने गड राखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2022 05:00 AM2022-02-16T05:00:00+5:302022-02-16T05:00:39+5:30

सोमवारी झालेल्या ५ नगर पंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक जागी अध्यक्ष निवडण्यात यश मिळविले. एकूण ९ नगर पंचायतींपैकी काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक ४ अध्यक्षपद आणि २ उपाध्यक्षपद, शिवसेनेच्या वाट्याला २ अध्यक्षपद, आविसंकडे २ अध्यक्ष आणि ३ उपाध्यक्षपद, भाजपच्या वाट्याला १ अध्यक्षपद तर राष्ट्रवादीच्या वाट्याला १ उपाध्यक्षपद आले. ३ ठिकाणच्या उपाध्यक्षांमध्ये १ राष्ट्रवादी बंडखोर, १ भाजप बंडखोर तर १ अपक्षाने पटकावले.

The BJP retained the fort at Bhamragad to the Congress | कोरची काँग्रेसकडे, भामरागडात भाजपने गड राखला

कोरची काँग्रेसकडे, भामरागडात भाजपने गड राखला

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : शिल्लक असलेल्या ४ नगर पंचायतींच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोरची आणि भामरागड येथे चुरसपूर्ण लढत झाली. यात कोरची काँग्रेसने तर भामरागडमध्ये भाजपने अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले. सिरोंचात स्पष्ट बहुमतामुळे आदिवासी विद्यार्थी संघाची निर्विवाद सत्ता आली तर मुलचेरा येथे अध्यक्षपद शिवसेनेच्या उमेदवाराची अविरोध निवड झाल्यानंतर उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेले.
सोमवारी झालेल्या ५ नगर पंचायतीत काँग्रेसने सर्वाधिक जागी अध्यक्ष निवडण्यात यश मिळविले. एकूण ९ नगर पंचायतींपैकी काँग्रेसच्या वाट्याला सर्वाधिक ४ अध्यक्षपद आणि २ उपाध्यक्षपद, शिवसेनेच्या वाट्याला २ अध्यक्षपद, आविसंकडे २ अध्यक्ष आणि ३ उपाध्यक्षपद, भाजपच्या वाट्याला १ अध्यक्षपद तर राष्ट्रवादीच्या वाट्याला १ उपाध्यक्षपद आले. ३ ठिकाणच्या उपाध्यक्षांमध्ये १ राष्ट्रवादी बंडखोर, १ भाजप बंडखोर तर १ अपक्षाने पटकावले. येत्या चार ते पाच दिवसात विषय समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे. 

भाजपच्या वाट्याला एकमेव नगराध्यक्ष

भामरागड : जिल्ह्यातील ९ पैकी एकमेव भामरागड नगर पंचायतीत आपली सत्ता बसविण्यात भाजपला यश आले. या ठिकाणी अध्यक्षपदासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात अटीतटीची निवडणूक झाली. केवळ एका मताने भाजपने ही जागा जिंकली. तर उपाध्यक्षपद आविसंने आपल्या पदरी पाडून घेतले. अध्यक्षपदी रामबाई महका तर उपाध्यक्षपदी विष्णू मडावी यांची निवड झाली. भामरागड नगर पंचायतमध्ये दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केली. यावेळच्या निवडणुकीत भाजपचे  ५ उमेदवार निवडून आले होते.  स्पष्ट बहुमत नसल्याने आविसं गटाचे ३, आणि अपक्ष उमेदवार १, अशी ९ मते भाजपला मिळाली. भाजपच्या  रामबाई महका यांच्याविरोधात शिवसेनेचे गजानन वारलु उईके यांना राष्ट्रवादी काँग्रेसची ३, कॉंग्रेसची २ आणि अपक्ष २ अशी एकूण ८ मते मिळाली.

मुलचेरात उपाध्यक्षपदी राकाँचे मधुकर वेलादी

मुलचेरा : येथील नगर पंचायतच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे  विकास ईश्वर नैताम यांची अविरोध निवड झाली. उपाध्यक्ष पदाकरिता आविसच्या सुनीता कुसनाके यांना ३ तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर वेलादी यांना १४ मते मिळून ते विजयी झाले. उपाध्यक्ष पदाकरिता आदिवासी विद्यार्थी संघातर्फे सुनीता रमेश कुसनाके व जास्वंदा गोंगले यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेश पेडूकर व मधुकर वेलादी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आविसंच्या जास्वंदा गोंगले यांचे एकच सूचक दोनवेळा झाल्याने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेश पेडूकर यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी आविसंतर्फे सुनीता कुसनाके तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मधुकर वेलादी यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि सेनेची युती होती. निवडणुकीनंतर मात्र युती संपुष्टात आली. सेनेने अपक्ष आणि आविसंच्या मदतीने अध्यक्षपदाची माळ आपल्या गळ्यात घातली. उपाध्यक्ष पदासाठी आविसंने कंबर कसली होती, मात्र शिवसेनेच्या काही नगरसेवकांमध्ये सुनीता कुसनाके यांच्याबद्दल नाराजी होती. त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ६, शिवसेना ४  व अपक्ष ४ अशी १४ मते मिळाली. उपविभागीय अधिकारी उत्तम तोडसाम, मुख्याधिकारी साळवे यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष पदासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी जि.प.चे बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, कोठारी ग्रामपंचायतचे उपसरपंच मनोज बंडावार, लतीफ शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

सिरोंचात आविसंच्या शेख फरजाना नगराध्यक्ष

सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायत नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी नगरपंचायत कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात अध्यक्षपदासाठी आविसंच्या शेख फरजाना इफ्तेखार तर शिवसेना-राष्ट्रवादी युतीकडून पद्मा सत्यनारायण भोगे यांनी नामांकन दाखल केले होते. यावेळी १० विरुद्ध ७ मतांनी शेख फरजाना विजयी झाल्या.उपाध्यक्षपदासाठी आविसंकडून शेख बबलू पाशा व राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश राचर्लावार यांनी नामांकन दाखल केले होते. यातही १० विरुद्ध ७ अशा फरकाने शेख बबलू पाशा विजयी झाले. पिठासीन अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, मुख्याधिकारी विशाल पाटील उपस्थित होते. यावेळी न.पं.च्या आवारात आदिवासी विद्यार्थी संघाचे तालुक्यातील अनेक गावांमधील सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.   निकाल लागताच  विजयी जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जल्लोषात गावातून मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी    माजी आमदार दीपक आत्राम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते   उपस्थित होते.

कोरचीत काँग्रेसच्या हर्षलता भैसारे,  अध्यक्ष तर अपक्ष हिरालाल राऊत उपाध्यक्ष

कोरची : नगरपंचायतीत नगराध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनुक्रमे काँग्रेसच्या हर्षलता भैसारे आणि अपक्ष हिरालाल राऊत यांनी निवड झाली. एक महिन्यापासून ‘नॉट रिचेबल’ असलेले काँग्रेसचे आठ नगरसेवक व राष्ट्रवादीची एक नगरसेविका यांनी मंगळवारी नगरपंचायतीला हजेरी लावली. सदस्यांनी हात वर करून मतदान केले. दोन्ही विजयी उमेदवारांनी प्रत्येकी १० मते पडली. पीठासीन अधिकारी म्हणून दर्शन निकाळजे, मुख्याधिकारी माधुरी सलामे, तहसीलदार सी. आर. भंडारी होते. कोरची नगरपंचायतीत काँग्रेस ८, भाजप ६, राष्ट्रवादी १, अपक्ष २ असे एकूण १७ सदस्य आहेत. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे काँग्रेसला एक राष्ट्रवादी आणि एक अपक्षाचे समर्थन मिळाल्याने काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली. भाजपने ६ सदस्यांसोबत एका अपक्षाला सोबत घेतले होते. शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसमधील कोणी नाराज सदस्य आल्यास सत्ता बसविण्याची तयारी भाजपने केली होती. मात्र काँग्रेसने तशी संधी दिली नाही. त्यासाठी जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रभारी एन. डी. किरसान व इतर पदाधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

 

Web Title: The BJP retained the fort at Bhamragad to the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.