नालीत आढळला अभियंत्याचा मृतदेह; मृत्यूचे कारण अस्पष्ट
By दिगांबर जवादे | Published: November 29, 2024 05:15 PM2024-11-29T17:15:06+5:302024-11-29T17:18:14+5:30
Gadchiroli : पाणीपुरवठा विभागात हाेते कार्यरत
गडचिराेली : शहरातील मूल मार्गावरील रिलायन्य पेट्राेलपंपाच्या अगदी समाेर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नालीत शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अभियंत्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. मृतदेह बघण्यासाठी शहरातील नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती. घातपाताचीही शक्यता काही जणांनी व्यक्त केली आहे.
धनपाल भलावी (४०) असे मृतकाचे नाव असून ते जिल्हा परिषदेच्या सिराेंचा येथील पाणीपुरवठा विभागात अभियंता म्हणून कार्यरत हाेते. ते मुळचे गाेंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील रहिवासी हाेत. त्यांचे कुटुंब गडचिराेली येथील आयटीआय परिसरातील पंचवटी नगरात भाड्याने राहत हाेते. भलावी हे बुधवारपासून बेपत्ता हाेते. दरम्यान त्यांच्या पत्नी रामटेक येथे नातेवाईकाकडे गेल्या हाेत्या. भलावी हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने गडचिराेली पाेलिस स्टेशनमध्ये दाखल केली हाेती. गडचिराेली शहरातील मूल मार्गावरील नालीत शुक्रवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास एका व्यक्तीला नालीमध्ये मृतदेह पडला असल्याचे दिसून आला. मृतदेहाचे डाेके पाण्यात बुडाला असल्याने ओळख पटत नव्हती. दरम्यान भलावी यांच्या पत्नीने तक्रार दाखल केली असल्याने मृतदेह त्यांचाच असू शकते, ही बाब पाेलिसांच्या लक्षात आली. पाेलिसांनी घटनास्थळी भलावी यांच्या नातेवाईकांना बाेलावले. त्यांनी ओळख पटवली. त्यानंतर पाेलिसांनी मृतदेह बाहेर काढला. स्थितीवरून भलावी यांचा मृतदेह दाेन दिवसांपूर्वीचा असल्याची शक्यता आहे. भलावी यांना दारू पिण्याचे व्यसन हाेते. यातच ते नालीत पडले, असावे अशी शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे. त्यांनी जॅकेट घातला हाेता, यावरून घटना रात्रीची असावी. त्यांचा नेमका कशामुळे मृत्यू झाला हे पीएम रिपाेर्ट व पाेलिस तपासात स्पष्ट हाेईल.