डाेक्यावर जखमा; पाय माेडलेला; आलापल्लीत आढळला युवकाचा मृतदेह
By गेापाल लाजुरकर | Published: October 29, 2023 03:25 PM2023-10-29T15:25:55+5:302023-10-29T15:26:20+5:30
राकेश फुलचंद कन्नाके (३५) वाॅर्ड क्रमांक १, श्रमिकनगरआलापल्ली असे मृत युवकाचे नाव आहे.
गडचिराेली : चारही बाजूंनी घरे, मध्यभागी माेकळी जागा. हा परिसर नेहमी गजबजलेला; पण याच परिसरात एक युवक मृतावस्थेत आढळला. ही घटना आलापल्ली येथील गाेंडमाेहल्ला वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये रविवार २९ ऑक्टाेबर राेजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. डाेके व अंगावरील जखमांवरून या युवकाचा खून झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
राकेश फुलचंद कन्नाके (३५) वाॅर्ड क्रमांक १, श्रमिकनगरआलापल्ली असे मृत युवकाचे नाव आहे. आलापल्लीच्या गोंडमोहल्ल्यात दिवंगत डाॅ. किशोर नैताम यांच्या मालकीचे खुले पटांगण आहे. याच परिसरात दिलीप तोडासे यांचे घर आहे. घराच्या बाजूला रविवारी सकाळी राकेश कन्नाके यांचा मृतदेह चिखलाने माखलेल्या स्थितीत आढळला. माहिती मिळताच राकेशची पत्नी, आई, भाऊ व शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. राकेशच्या कपाळाला डाव्या डोळ्यावर गंभीर खाेल जखम हाेती. तसेच चेहरा, नाकावर जखम हाेती. एक पाय माेडलेला हाेता. शिवाय अंगावर काही जखमा हाेत्या. त्यामुळे राकेशचा खूनच झाला असावा, अशी शंका वर्तवली जात आहे.
याबाबतची माहिती मिळताच पाेलिस निरीक्षक मनाेज काळबांडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. फाॅरेन्सिक टीमसुद्धा दाखल झाली. दरम्यान पोलिस उपनिरीक्षक बालाजी सोनुने, पोलिस निरीक्षक संतोष मरस्कोल्हे, पोलिस अंमलदार संजय चव्हाण, पोलिस हवालदार किशोर बांबोळे आदींनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेत उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.
विविध शंकांना फुटले पेव
मृत राकेश हा वाॅर्ड क्रमांक १ श्रमिकनगर येथे राहत होता. परंतु त्याचा मृतदेह वाॅर्ड नंबर ४ मध्ये आढळून आला. ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह आढळला ती जागा ओलसर आहे; पण अंगाला चिखल माखेल एवढी दलदलीची नाही. तरीसुद्धा त्याच्या अंगाला चिखल माखला हाेता. त्यामुळे त्याचा खून घटनास्थळी झाला नसावा. चिखल परिसरातच त्याला मारून माेकळ्या जागेत आणले असावे.
रात्री जेवण करून निघाला; पण कायमचाच...
राकेश हा शनिवारी रात्री घरी जेवण करून ९ वाजताच्या सुमारास बाहेर पडला. त्यानंतर ताे घरी परत आला नाही. कुटुंबातील सदस्य घरी त्याची वाट पाहत हाेते; परंतु दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेहच आढळून आल्याने धक्काच बसला. विशेष म्हणजे, घटनास्थळापासून राकेशचे घर १ किमी अंतरावर आहे.