सीमेवरच्या शहरात प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2022 05:00 AM2022-05-22T05:00:00+5:302022-05-22T05:00:47+5:30

सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील प्रवाशांचे एकमेकांकडे जाणे-येणे वाढले आहे. मात्र, बसेस उभ्या करण्यासाठी किंवा बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना बसण्याची सुविधाच नसल्यामुळे चक्क झाडाखाली, उघड्यावर बसून बस स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. आंतरराज्यीय वाहतूक प्रवाशांची वाढलेली वर्दळ पाहता सिरोंचा मुख्यालयात सुसज्ज बस स्थानकाची गरज आहे.

The condition of travelers in the border town | सीमेवरच्या शहरात प्रवाशांचे हाल

सीमेवरच्या शहरात प्रवाशांचे हाल

Next

कौसर खान
लाेकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील आणि तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेवरील सिरोंचा शहरात गेल्या तीन वर्षांच्या कालावधीपासून एसटी बस स्थानकाचे काम सुरू आहे. हे काम अजूनही पूर्णत्वास गेले नसल्यामुळे एसटीच्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. भर उन्हात उघड्यावर बसणाऱ्या प्रवाशांना आता भर पावसाळ्यातही पावसात भिजत बसची प्रतीक्षा करावी लागणार का, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
सिरोंचालगत असलेल्या प्राणहिता, गोदावरी नद्यांवर आता पूल झाल्यामुळे सीमेपलीकडून होणारी एसटी बसेसची वाहतूक वाढली आहे. सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील प्रवाशांचे एकमेकांकडे जाणे-येणे वाढले आहे. मात्र, बसेस उभ्या करण्यासाठी किंवा बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना बसण्याची सुविधाच नसल्यामुळे चक्क झाडाखाली, उघड्यावर बसून बस स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. आंतरराज्यीय वाहतूक प्रवाशांची वाढलेली वर्दळ पाहता सिरोंचा मुख्यालयात सुसज्ज बस स्थानकाची गरज आहे. ही गरज लक्षात घेऊनच येथे तीन वर्षांपूर्वी नवीन बस स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले. तत्कालीन पालकमंत्री अंबरिशराव आत्राम यांच्या कार्यकाळात पायाभरणी झाल्यानंतर बांधकामाला सुरुवातही करण्यात आली, मात्र सत्ताबदलानंतर बस स्थानकाचे बांधकाम अर्धवट अवस्थेत पडून आहे.

या स्थितीसाठी जबाबदार कोण?
-    तीन राज्यांच्या मुखाशी असलेल्या सिरोंचा तालुका मुख्यालयातील या बस स्थानकाची ही दुरवस्था पाहता त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न स्थानिक नागरिक करीत आहेत. 
-    पाच कोटी रुपये खर्चून या बस स्थानकाची उभारणी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र गेल्या २ वर्षांपासून हे कामच ठप्प आहे.  पायाभरणीपर्यंतचे बांधकाम झाल्यानंतर पुढचे बांधकाम अचानक थांबले आहे. त्यासाठी निधीची कमतरता असल्याचे सांगितले जाते. 
-    भाजप पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कार्यकाळात निधीची व्यवस्था करूनच बांधकाम सुरू करण्यात आले होते. मग, अचानक निधीची कमतरता कशी पडली, पुरेसा निधी  का दिल्या जात नाही, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

झाडाखाली बसून पाहतात बसची वाट

या बसस्थानकाच्या परिसरात प्रवाशांसाठी सध्या ना बसण्याची व्यवस्था आहे, ना सुसज्ज स्वच्छतागृहे बनवण्यात आली आहेत. प्रवाशांच्या संख्येनुसार आसन व्यवस्थाही केलेली नाही. अशात दररोज सिरोंचात दाखल होणाऱ्या राज्य आणि आंतरराज्यीय बसेसमधून दररोज येणाऱ्या एक हजार प्रवाशांचे हाल होत आहे. 

प्रवाशांना नाईलाजाने झाडाच्या सावलीत बसून बसची वाट पाहावी लागत आहे. जुन्या बसस्थानकाच्या इमारतीत प्रवाशांना बसण्याची सोय आहे, मात्र बसेस तिकडे येतच नसल्याने झाडांच्या सावलीत थांबणे प्रवाशी पसंत करत आहेत.

 

Web Title: The condition of travelers in the border town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.