चालकाची सटकली...बस रस्त्यात सोडून धूम ठोकली; विद्यार्थ्यांसह ४५ प्रवासी दोन तास ताटकळले
By संजय तिपाले | Published: December 19, 2023 07:32 PM2023-12-19T19:32:28+5:302023-12-19T19:32:37+5:30
दुर्गम मद्दीगुडममधील प्रकार
गडचिरोली: विद्यार्थ्यांसह प्रवाशांना घेऊन निघालेली बस वाटेत आदळली, चालक बस वाकडीतिकडी चालवित असल्याने प्रवासी ओरडले. त्यानंतर चालकाचा पारा चढला व बस वाटेतच थांबवली. बससहवाहक व प्रवाशांना तेथेच सोडून चालक दुचाकीस्वाराची लिफ्ट घेऊन परतला. यामुळे ४५ प्रवाशांना दोन तास ताटकळावे लागले. अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम या दुर्गम गावाजवळ १८ डिसेंबरला सायंकाळी हा प्रकार घडला.
दुर्गम, अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाशाळेत ये- जा करण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी मानव विकास मिशनमार्फत एसटी महामंडळाला बस दिलेल्या आहेत. या बस सामान्य प्रवाशांनाही सेवा देतात. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी अहेरी आगारातून मानव विकास मिशनची बस (एमएच ४० वाय- ५६०१) विद्यार्थी व इतर प्रवाशांना घेऊन चालक चंदू कोयेड्डी हा आलापल्ली - एटापल्ली मार्गे बोलेपल्लीला निघाला हाेता. सायंकाळी पाच वाजता बस मद्दीगुडम गावाजवळील सुरजागड लोहप्रकल्पाच्या डंपींग ग्राऊंडलगत पोहोचली.
यावेळी बसमध्ये ४५ प्रवासी होते. चालकाचे नियंत्रण सुटले व खड्ड्यात बस आदळली, शिवाय बस वाकडीतिकडी धावत असल्याने प्रवाशांनी आक्षेप घेतला. त्यावर चालकाने बस थांबवली. चालक व बसमधील प्रवाशीही खाली उतरले. त्यानंतर चालक व प्रवाशांत किरकोळ शाब्दिक चकमक उडाली. तेथून जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हात दाखवून चालक अहेरीला निघून गेला. इकडे बससह वाहक व प्रवाशी वाटेतच ताटकळले. अखेर काही प्रवाशांनी खासगी वाहनातून आपले गाव जवळ केले तर काहींनी दुसऱ्या बसमधून पुढचा प्रवास केला. वाहकाने संपर्क करुन दुसरा चालक बोलावला, त्यानंतर बस अहेरीला नेली.
निलंबनाचा प्रस्ताव पाठविणार
याबाबत अहेरीचे आगार व्यवस्थापक चंद्रभूषण घागरगुंडे यांना संपर्क केला असता त्यांनी घडल्या प्रकाराला दुजोरा दिला. संबंधित चालकाने असे का केले, याचे कारण अस्पष्ट आहे, पण घडला प्रकार चुकीचा आहे. प्रवाशांना चांगल्या सेवा देण्याचा प्रयत्न आहे.या बसवरील वाहकाचा जबाब नोंदविला जाईल, त्यानंतर चालकाच्या निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.