एसटीचे स्टेअरिंग साेडून चालकाने मारला खर्रावर ताव; आगाराकडून वेगळेच स्पष्टीकरण
By दिगांबर जवादे | Published: December 11, 2023 07:55 PM2023-12-11T19:55:14+5:302023-12-11T20:03:01+5:30
चालक व बस गडचिरोली आगाराची नसल्याचा आगाराचा दावा
दिगांबर जवादे, गडचिराेली: बस चालविताना खर्रा खाण्याची तल्लफ झाली अन् चालकाने स्टेअरिंग हाती पकडून पुडी उघडून खर्रा तोंडात टाकला. याचा व्हिडीओ ११ डिसेंबरला एका प्रवाशाने सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान, येथील आगाराने हा व्हिडीओ गडचिरोलीतील नसल्याचा दावा केला आहे.
पूर्व विदर्भातील चालक व वाहकांना खर्रा खाण्याचे व्यसन आहे. खर्रा खाऊन ते बसमध्येच थुंकतात. नागपूर-गडचिराेली मार्गावरील एका बसचालकाने कहरच केला. धावत्या बसमध्येच दाेन्ही हातांनी खर्राची पुडी साेडली. स्टेअरिंगवरील हातांची पकड सैल झाल्याने एसटी रस्त्याच्या बाजूला जायला लागते. मात्र , ताेल सावरत पुन्हा चालक हाताच्या काेपऱ्यांनी एसटीचे स्टेअरिंग फिरवत असल्याचे दिसत आहे. एसटीमधील एका प्रवाशाने व्हिडीओ काढून ताे समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. यावर नेटकऱ्यांकडून टीकेचा भडिमार हाेत असून, त्या चालकावर कारवाई करावी, अशी मागणी हाेत आहे. व्हिडीओमध्ये बसचा क्रमांक दिसून येत नाही. त्यामुळे चालक नेमक्या काेणत्या आगाराचा कर्मचारी आहे हे स्पष्ट झाले नाही.
दरम्यान, यापूर्वी अहेरी आगारातील एका बसचे छत हवेत भिरभिरत असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पावसाळ्यात एका हाताने स्टेअरिंग व दुसऱ्या हाताने वायफर फिरवतानाचा याच आगारातील चालकाचा व्हिडीओ समोर आला होता. आता खर्रा खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्य परिवहन महामंडळाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
हा व्हिडीओ पाहिला आहे. मात्र, तो गडचिरोलीचा नाही. त्यात दिसणारा चालक व बसदेखील गडचिरोली आगाराची नाही.
- चंद्रकांत वडसकर, वाहतूक नियंत्रक, गडचिरोली