‘त्या’ दोन बछड्यांच्या मृत्यूचे गूढ उकलेना, वनविभाग म्हणतो..
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 02:25 PM2023-01-11T14:25:44+5:302023-01-11T14:28:29+5:30
टी-६ वाघिणीला पकडण्यासाठी पुन्हा पथक सज्ज
गडचिरोली : तालुक्यातील अमिर्झा बीटमध्ये गेल्या ३ आणि ६ जानेवारीला अवशेष मिळालेल्या टी-६ वाघिणीच्या ४ पैकी २ बछड्यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. मात्र, त्या परिसरात आलेल्या नर वाघानेच त्यांना मारून टाकले असण्याची दाट शक्यता गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. दरम्यान, १० लोकांचा बळी घेणाऱ्या टी-६ वाघिणीला तिच्या उर्वरित दोन बछड्यांसह जेरबंद करण्यासाठी पुन्हा ताडोबाचे पथक सज्ज करण्यात आले आहे.
टी-६ वाघिणीने चार ते पाच महिन्यांपूर्वी ४ पिल्लांना जन्म दिला. चारही पिल्लांसोबत ती एकदाच वन विभागाच्या कॅमेऱ्यात दिसली. त्यानंतर पिल्ले लहान असल्यामुळे तिला पकडण्याची मोहीम स्थगित केली होती. परंतु, त्यानंतरही तिने दोन मनुष्यबळी घेतल्यामुळे तिला पिल्लांसह पकडण्याची परवानगी वन्यजीव विभागाने दिली.
विशेष म्हणजे टी-६ वाघिणीच्या चारपैकी दोन पिल्लांचे अवशेष मिळाले असले तरी उर्वरित दोन पिल्लंसुद्धा गेल्या आठवडाभरात ट्रॅप कॅमेऱ्यात दिसलेली नाहीत. मात्र, त्यांच्या पायाचे ठसे दिसले आहेत. त्यामुळे आईसोबत ती दोन्ही पिल्लं असण्याची शक्यता आहे. ताडोबाची चमू त्यांना बेशुद्ध करून पिंजऱ्यात कैद करण्यासाठी जंगलात बेट (शिकार) लावून आहेत. ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनेही वाघिणीचा माग काढला जात आहे.
...म्हणून नर वाघ मारतो बछड्यांना
- नर वाघ आपले सीमाक्षेत्र निश्चित केल्यानंतर त्यात वाघिणीशिवाय दुसऱ्या कोणाला येऊ देत नाही. वाघिणीसोबत बछडे असल्यास ती नर वाघापासूनही दूर राहाते. त्यामुळे वाघाला तिच्याशी समागम करता येत नाही. त्यामुळेच टी-६ वाघीण शिकार करण्यासाठी लांब गेल्यानंतर नर वाघाने तिच्या दोन बछड्यांना मारले असण्याची शक्यता वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
- वाघाने हल्ला केला त्यावेळी चारपैकी दोन बछडे जवळपास कुठेतरी असावेत. त्यामुळे वाघाच्या हल्ल्यापासून ते बचावले असावेत, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. दोन बछड्यांचे अवशेष वेगवेगळ्या दिवशी, तीन दिवसांच्या फरकाने २०० मीटर अंतरावर मिळाले. मात्र, त्यांना एकाच वेळी मारलेले आहे, असेही वन विभागाने सांगितले.