शिकारी खुद यहां शिकार हो गया...; विद्युतप्रवाह सोडून करणार होते वन्यजीवाची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2023 04:42 PM2023-03-22T16:42:10+5:302023-03-22T18:14:15+5:30
त्रिकूट अडकले जाळ्यात
- कौसर खान
सिरोंचा (जि.गडचिरोली): नमक हलाल या चित्रपटातील शिकारी खुद यहां शिकार हो गया... यह क्या सितम हुआ.. हे गाणे आठवत का, या गाण्याला साजेसा प्रसंग २१ मार्चला सिरोंचा येथे अनुभवयास आला. वन्यजीवाची शिकार करण्यासाठी तिघांनी जाळे अंथरले, त्यात विद्युतप्रवाह सोडण्याच्या तयारी असताना वनविभागाच्या पथकाने त्यांना पकडले.
रामुलू पोचम अर्का,श्रीनिवास पोचम गावडे, स्वामी रामुलू कोडपे (सर्व रा.नंदीगाव ता.सिरोंचा) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. २१ मार्च रोजी आरडा नियतक्षेत्रातील जंगलात खंड क्र.३५६ मध्ये क्षेत्र सहायक एस.एस.नीलम, व्ही.ए.कागल, वनरक्षक आर.वाय.तलांडी हे गस्तीवर होते.
रामुलू अर्का हा त्याच्या दोन साथीदारांसमवेत वन्यजीव शिकारीच्या उद्देशाने जमिनीमध्ये लाकडी खुंट्या रोवून दोन ते अडीच फूट उंचीवर बाईंडिंग तार खुंट्याला बांधून पसरवित असताना आढळुन आले. वनकर्मचाऱ्यांना पाहून त्यांनी पलायनाचा प्रयत्न केला. यावेळी वनविभागाने रामुलू अर्का यास पकडले. वन्यजीव (संरक्षण) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर श्रीनिवास गावडे व स्वामी कोडपे यांना ताब्यात घेतले .. उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. पाझारे हे तपास करत आहेत.