नियतीचा असाही खेळ... हिरावला गोड परिवार, अश्रूंच्या सोबतीला उरला बांबूकलेचा आधार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 02:48 PM2023-03-16T14:48:19+5:302023-03-16T14:55:41+5:30

मूकबधिर मिथुनच्या आयुष्याची परवड, अबोल भावनांची करुण कहाणी

The hard life of a deaf-mute Mithun; family lost, lives Atmanirbhar life with skill of bamboo work | नियतीचा असाही खेळ... हिरावला गोड परिवार, अश्रूंच्या सोबतीला उरला बांबूकलेचा आधार!

नियतीचा असाही खेळ... हिरावला गोड परिवार, अश्रूंच्या सोबतीला उरला बांबूकलेचा आधार!

googlenewsNext

पुंजीराम मेश्राम

वडधा (गडचिरोली) : नियतीचा खेळ किती विचित्र असतो. काही जणांना भरभरुन मिळते, तर कोणाची झोळी रितीच राहते, एवढेच काय पावलाेपावली नव्या संकटांना तोंड देत आयुष्याची वाटचाल करावी लागते. आरमोरी तालुक्यातील डारली येथील मिथुन बाळू मडावी या तिशीतील मूकबधिर तरुणाची व्यथा यापेक्षा वेगळी नाही. जन्मताच मूकबधिर असलेल्या मिथुनपासून नियतीने संपूर्ण परिवार हिरावून घेतला. आता त्याच्या जगण्यात अश्रूंच्या सोबतीला केवळ बांबू हस्तकलेचा आधार उरला आहे.

आरमोरी तालुक्यातील डारली हे दुर्गम भागात वसलेले छोटेसे गाव. या गावातील बाळू मडावी यांचा मिथुन हा धाकटा पुत्र. जन्मत:च तो मूकबधिर. चामोर्शी येथील मूकबधिर शाळेत त्याने नववीपर्यंत शिक्षण घेतले. त्याची वाचा नियतीने आधीच हिरावून घेतली होती, त्यामुळे जगणे अबोल होते, पण नियतीची परीक्षा एवढ्यावर थांबली नाही. १५ वर्षांपूर्वी त्यास पहिला धक्का बसला, जेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले. आधी वडील व नंतर आई सुमित्रा, भाऊ जगन व भावजय अशा सगळ्यांना नियतीने त्याच्यापासून हिरावले. एक बहीण आहे, पण ती लग्न होऊन सासरी गेली आहे.

कुटुंबातील चौघांचा एकापाठोपाठ एक आकस्मिक मृत्यू झाला. एका दु:खातून सावरत नाही तोच दु:खाचा दुसरा डोंगर त्याच्यापुढे उभा असायचा. त्यामुळे त्याला आधार देणारे हक्काचे कोणी या जगात उरले नाही. तो मूकबधिर असल्याने आयुष्याचा जोडीदारही त्याला मिळू शकला नाही. मात्र त्याने शिक्षण घेतानाच बांबू हस्तकला अवगत केलेली आहे. या माध्यमातून त्याने जहाज, घर, तिरंगी झेंडे अशा विविध प्रकारच्या गृह सजावटीच्या वस्तू बनविल्या आहेत. या वस्तू बनविताना जीव ओतणाऱ्या मिथुनला या कलेनेच आधार दिला आहे. या वस्तूंच्या विक्रीतून मिळणाऱ्या चार पैशांवरच त्याची गुजराण सुरू आहे. मात्र, कधीकधी या वस्तूवर उदरनिर्वाह शक्य होत नाही, त्यामुळे त्यास पोट भरण्यासाठी परराज्यात जावे लागते.

मूकबधिर असूनही आत्मनिर्भर

मिथुन मूकबधिर आहे, पण दिव्यांग असल्याचे भांडवल न करता तो स्वाभिमानाचे जीवन जगत आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत, पण गरीब व सुखी परिवाराच्या आठवणी तेवढ्या आहेत. या आठवणींच्या झुल्याला बांबूकलेची साथ देत तो दिवस कंठत असल्याचे गावकरी सांगतात.

ना हक्काचे छत ना कुठला लाभ

दिव्यांगांसाठी शासनाकडून भरमसाठ योजना राबविण्यात येतात, पण कमनशिबी असलेल्या मिथुनच्या पदरात अद्याप एकही योजना पडलेली नाही. त्याला ना घरकुलाचा लाभ मिळाला ना कुठले अनुदान. त्यामुळे नियतीने आयुष्याची परवड केलेल्या मिथुनला व्यवस्थेचा मदतीचा हात मिळू शकला नाही, हे दुर्दैवच असल्याची खंत सरपंच प्रिया गेडाम यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

Web Title: The hard life of a deaf-mute Mithun; family lost, lives Atmanirbhar life with skill of bamboo work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.