फेरीवाल्यांचे साेंग घेऊन आलेल्या शिकारी टाेळीचा वाघांवर डाेळा? वन विभागाच्या जागेवरच मुक्काम ठाेकून रचत हाेते कट
By गेापाल लाजुरकर | Published: July 24, 2023 07:53 PM2023-07-24T19:53:02+5:302023-07-24T19:53:16+5:30
वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युराेने देशभरातील व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारीची शक्यता वर्तवली हाेती.
गडचिराेली : वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युराेने देशभरातील व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या शिकारीची शक्यता वर्तवली हाेती. त्यांचा हा अंदाज अगदी तंताेतत खरा ठरत असतानाच गडचिराेली जिल्ह्यातही वाघांच्या शिकारीचा आसाममधून आलेल्या एका भटक्या जमातीतील १६ सदस्यांना वन विभागाने २३ जुलैच्या मध्यरात्री तालुक्याच्या आंबेशिवणी येथून ताब्यात घेतले. परंतु ही जमात आंबेशिवणी येथे पर्स, बॅग व भांडी विकणाऱ्या फेरीवाल्यांचे साेंग घेऊन वावरत हाेते. गडचिराेली वनवृत्तातील वाघांच्या शिकारीवर त्यांचा डाेळा हाेता काय, की त्यांनी वाघांची शिकार केली, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.
वन विभागाच्या जागेवरच झाेपड्या थाटून येथे वाघांच्या शिकारीचे षड् यंत्र रचताना वनविभागाच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी लक्ष का दिले नाही. तसेच गावात बाहेरून येणाऱ्या फेऱ्यावाल्या किंवा भटक्या जमातीच्या लाेकांची खातरजमा जबाबदार लाेकांनी का केली नाही, असा प्रश्न आहे.
वनवृत्तातील वाघ सुरक्षित आहेत काय?
गडचिराेली व वडसा वन विभागात गडचिराेली तालुक्यातील जंगलाचा समावेश हाेताे. आंबेशिवणी, दिभना, जेप्रा परिसराच्या जंगलात ६, तर वडसा वन विभागात २१ वाघांचा वावर आहे. गडचिराेली तालुक्यात जी-१, जी-१०, एसएएम-८२, जी-१६ आदी नर वाघांचा, तर जी २ व जी-५, टी- ६ आदी मादी वाघांचा समावेश आहे. गुरवळा नेचर सफारीत जी- १० ही वाघीणसुद्धा आपल्या ४ बछड्यांसह वावरत आहेत. हे सर्व वाघ सुरक्षित तर असतील ना, असा प्रश्नसुद्धा आहे. वनविभागाने ह्या वाघांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.
लाेकांचा आराेप, शेळ्या दडविल्या का ?
आंबेशिवणी येथे पटाच्या जागेवर फेरीवाल्यांचे साेंग घेऊन काही दिवस मुक्काम केलेल्या त्या भटक्या जमातीच्या लाेकांकडे दाेन शेळ्या हाेत्या. परंतु ह्या शेळ्या वन विभागाने हस्तगत केलेल्या मुद्देमालामध्ये दाखविल्या नाही. त्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवरच गावकऱ्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
बॅगा भरून साडेपाच लाख हाेते का?
शिकार करणाऱ्या भटक्या जमातीतील लाेकांकडे त्यांच्या ठिय्यास्थळी ५ लाख ५५ हजार रुपये विविध ठिकाणी हाेते. यापैकी काही रक्कम बॅगेत भरून हाेती तर काही रक्कम जमिनीत गाडून हाेती, असा आराेप आंबेशिवणीचे उपसरपंच याेगेश कुडवे व तंमुस अध्यक्ष माेहन पाल यांनी केला. रक्कम हस्तगत केली तेव्हा स्थानिक सरपंच, पाेलिस पाटील यांना पंचनामा करण्यासाठी का बाेलावले नाही, असेही कुडवे म्हणाले.