अतिदुर्गम रेगुंठाची 'लेडी ड्रायव्हर' घेणार इंग्लंडमध्ये शिक्षण

By दिगांबर जवादे | Published: July 28, 2023 01:40 PM2023-07-28T13:40:21+5:302023-07-28T13:43:09+5:30

राज्य शासन देणार ४० लाखांची शिष्यवृत्ती

The lady driver Kiran Kurma of the remote Regunta will study in England | अतिदुर्गम रेगुंठाची 'लेडी ड्रायव्हर' घेणार इंग्लंडमध्ये शिक्षण

अतिदुर्गम रेगुंठाची 'लेडी ड्रायव्हर' घेणार इंग्लंडमध्ये शिक्षण

googlenewsNext

दिगांबर जवादे

गडचिराेली : सिराेंचा तालुक्यातील रेगुंठा ते सिराेंचापर्यंत काळीपिवळी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या किरण कुर्मा या २४ वर्षीय युवतीला राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाने ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. या शिष्यवृत्तीच्या मदतीने ती इंग्लंड देशातील लंडनमध्ये इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट हा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून दाेन वर्ष एखाद्या कंपनीत काम करणार आहे. त्यानंतर ती देशात परत येणार आहे.

रेगुंठा हे गाव सिराेंचापासून सुमारे ६० किमी अंतरावर आहे. किरण ही उच्चविद्याविभूषित आहे. तिने तेलंगणा राज्यातील हैदराबाद उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. अर्थशास्त्र या विषयात ती एम.ए आहे. शिक्षण घेतल्यानंतर राेजगाराचे साधन म्हणून तिने रेगुंठा ते सिराेंचादरम्यान काळीपिवळी चालविण्यास सुरूवात केली. सुरुवातीला तिच्याकडे एकच टॅक्सी हाेती. या व्यवसायात स्वत:ला झाेकून घेतले. त्यामुळे या व्यवसायातून चांगली कमाई झाली. त्यामुळे या व्यवसायात तिने वाढ करण्याचा निर्णय घेतला. आज ती तीन ट्रॅक्सींची मालक आहे.

एवढ्यावरच न थांबता तिने मार्केटिंगचे उच्च शिक्षण इंग्लंड देशातून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी लाखाे रुपयांचा खर्च येताे. हा खर्च भागविण्यासाठी तिने मुंबई गाठून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी तिच्यासाठी ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. या शिष्यवृत्तीच्या मदतीने किरणचे विदेशात शिकण्याचे स्वप्न पूर्ण हाेणार आहेत.

किरणचे हे यश गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील युवकांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.

मुख्यमंत्र्यांनी दाखविली तत्परता

किरण कुर्माने मित्रांच्या मदतीने विधानभवन गाठले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानसभेच्या कार्यालयात हाेते. या कार्यालयात किरणने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. किरणने विदेशात शिकण्याची इच्छा व्यक्त केली व अर्ज मुख्यमंत्र्यांच्या हातावर ठेवला. मुख्यमंत्र्यांनी अतिशय तत्परता दाखवत समाज कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे यांना फाेन केला व किरणला मंत्रालयात जाण्यास सांगितले. किरण सचिवांकडे पाेहाेचेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी व्हाॅट्सॲपद्वारे भांगे यांच्याकडे अर्ज पाठविला. भांगे यांनी तेव्हाच गडचिराेलीचे समाज कल्याण अधिकारी यांना फाेन करून किरणचा प्रस्ताव तत्काळ मंत्रालयात पाठविण्याची निर्देश दिले. दि. ३१ जुलैपूर्वी संपूर्ण प्रक्रिया पार पाडून शिष्यवृत्तीची रक्कम किरणला मिळणार आहे.

Web Title: The lady driver Kiran Kurma of the remote Regunta will study in England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.