तलावानेच केले शेकडाे हेक्टर शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2022 05:00 AM2022-07-16T05:00:00+5:302022-07-16T05:00:07+5:30
नवेगाव माल येथील गावतलाव पुरातन आहे. तलावाच्या आतील भागात शेती आहे. त्यामुळे आतील भागात शेतजमीन असलेले शेतकरी तलावात मुबलक पाणी साचू देत नाही. तलाव पाळ ही गवती जागेत असून तलावातील आतील भागात शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. वीस वर्षांपूर्वी तलावातील आतील जमिनी लागवडीखाली पाहिजे त्या प्रमाणात नव्हत्या. आता मात्र आतील भागात असलेल्या शेतजमिनी लागवडीखाली आल्या असल्याने तलावातील पाणी जाण्यासाठी मार्ग नाही.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नवेगाव (माल) येथील गावतलावाची पाळ फुटून तलावामागील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले आहे. त्यामुळे आवत्या व धान प-ह्यांमध्ये गाळ साचून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नवेगाव माल येथील गावतलाव पुरातन आहे. तलावाच्या आतील भागात शेती आहे. त्यामुळे आतील भागात शेतजमीन असलेले शेतकरी तलावात मुबलक पाणी साचू देत नाही. तलाव पाळ ही गवती जागेत असून तलावातील आतील भागात शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. वीस वर्षांपूर्वी तलावातील आतील जमिनी लागवडीखाली पाहिजे त्या प्रमाणात नव्हत्या. आता मात्र आतील भागात असलेल्या शेतजमिनी लागवडीखाली आल्या असल्याने तलावातील पाणी जाण्यासाठी मार्ग नाही. अधूनमधून दरवर्षी तलाव पाळ फुटत असते. सध्या हे तलाव वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. महसूल विभाग याकडे लक्ष देत नाही. केवळ भेटी देऊन वेळ मारून निघून जाते. तलावातील ओव्हरफ्लोचे पाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने तलाव पाळ फुटून नुकसान सहन करण्याची दुर्दैवी पाळी शेतकऱ्यांवर येत असते.
कधी रोवणी झाल्यावर तलाव फुटत असते. त्यामुळे तलावामागील शेतकऱ्यांचे नुकसान होते. तलाव पाळ फुटल्यावर शेतकरी वर्गणी गोळा करून पाळीची दुरुस्ती करीत असतात. मात्र तलाव मजबुतीकरणाकडे संबंधित विभाग लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी उपसरपंच चरणदास चौधरी, तंमुस अध्यक्ष बाबुराव चौधरी, छबिलदास चौधरी, पोचू कोहपरे, तुकड्यादास कोहपरे, बंडू चौधरी, टूमदेव डायकी, आत्माराम चौधरी, मंगलदास चौधरी, प्रवीण चौधरी, विलास कोहपरे, नकटू भिवनकर, पुरुषोत्तम डायकी, प्रेमाजी चौधरी, भैय्याजी चौधरी, मारोती दिघोरे, वासुदेव चौधरी, मारोती चौधरी यांनी केली आहे.