भरकटलेला हत्ती पुन्हा परतला; तीन शेतकऱ्यांच्या पिकांची केली नासधूस
By गेापाल लाजुरकर | Published: July 19, 2023 04:07 PM2023-07-19T16:07:04+5:302023-07-19T16:07:29+5:30
काेरची तालुक्यात प्रवेश : धान पिकासह मका व केळीचे नुकसान
गडचिराेली : ओडिसा राज्यातील जंगली हत्तीचा कळप छत्तीसगडमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करून कोरची, कुरखेडा, धानोरा आदी तालुक्याच्या गावातील शेतमालाचे, घराचे, धानपिकाचे, मोहफुलाचे नुकसान रब्बी हंगामात केले हाेते. आता पुन्हा १८ जुलै राेजी रात्री ११ वाजताच्या सुमारास भरकटलेल्या हत्तीने काेरची तालुक्यात प्रवेश करून केळी, मका व अन्य पिकांचे नुकसान केले.
कोरची तालुक्यातील अतिदुर्गम चरवीदंड व लेकुरबोडी परिसरातील शेतात एक हत्ती आला. येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतमालाचे, सांदवाडीतील केळीचे तसेच मका पिकाचे नुकसान केले. या घटनेची माहिती बेडगाव वनविभागाला मिळताच १९ जुलै राेजी सकाळी सहा वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मीकांत ठाकरे तसेच वन वन कर्मचाऱ्यांनी लेकुरबोडी व चरवीदंड गावात जाऊन जंगल परिसरात आणि त्या भागात गस्त लावली.
लेकुरबोडी येथील नवलसाय फागू गावडे यांच्या सांदवाडीतील केळी व शेतातील मक्का पिकाचे नुकसान केले तर चरवीदंड येथील आसाराम शितरू केरामी यांच्या धान पिकाचे नुकसान व तुळशीराम शितरू केरामी यांच्या सांदवाडीतील मक्का पिकाचे नुकसान केले. घटनास्थळावर वन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. पंचनामा करताना बेळगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. ठाकरे, नवेझरी क्षेत्र सहायक ए.एन. जीवतोडे, मसेलीचे क्षेत्र सहायक आर. पी. कापकर, वनरक्षक एस. एम. दोनाडकर, एम. एल. गोखे, एस. एस. दातार, सी. के. चौधरी, आर. के. हलामी, व्ही. एस. कवडो, एन. आर. मितलामी आदी उपस्थित होते.
मागील वर्षी एका महिलेचा घेतला बळी
मागील वर्षी लेकुरबोडी गावातील एका वृद्ध महिलेला हत्तीने सोंडेत पकडून तिचे बळी घेतला हाेता, तर कोरचीचा एक व्यापारी दुचाकीने येत असताना बेडगाव घाटापुढील मार्गावर हत्तीने सोंडेने धक्का देऊन जखमी केले होते.
हा हत्ती भरकटलेला असून एकटा आहे. त्याला नागरिकांनी डिचवू नये, तसेच फोटो काढण्यासाठी जवळ जाऊ नये. फटाके फोडू नये, हत्तीविषयी काही माहिती असल्यास त्वरित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात कळवावे.
- लक्ष्मीकांत ठाकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी बेडगाव