वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू तुळशी येथील वराने सहकुटुंब केले मतदान
By गेापाल लाजुरकर | Published: April 19, 2024 01:36 PM2024-04-19T13:36:17+5:302024-04-19T13:42:15+5:30
देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथील एका वराने शुक्रवारी सकाळी विवाह समारंभासाठी गावातून वरात निघण्यापूर्वी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावत ‘वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू’ म्हणत लोकशाहीचा मान राखला
गडचिराेली : लाेकशाहीच्या उत्सवात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी देसाईगंज तालुक्याच्या तुळशी येथील एका वराने शुक्रवारी सकाळी विवाह समारंभासाठी गावातून वरात निघण्यापूर्वी मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. ‘वरात नंतर काढू, आधी मतदानाचा हक्क बजावू’ याचा प्रत्यय तुळशी येथे आला.
देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथील रहिवासी सुरेश अवसरे यांचे चिरंजीव प्रफुल यांचा विवाह मु. सोनी (चप्राड) ता. लाखांदूर जि. भंडारा येथील रहिवासी आनंदराव भावे यांची कन्या शिल्पा हिच्या सोबत शुक्रवार १९ एप्रिल रोजी सकाळी ११: ३० वाजता नियाेजित हाेता. हा विवाह साेहळा वधुमंडपी सोनी (चप्राड) येथे पार पडणार हाेता. विवाह संमारंभाला जाण्यापूर्वी वराने आई-वडील, आजी, काका यांच्यासह तुळशी येथील बुथ क्रमांक १३३ वर सहकुटूंब मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. नागरिकांनी व्यस्त कामातूनही वेळ काढून लाेकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करावे, असे आवाहन प्रफुल अवसरे यांनी केले.